पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातून फाळणीवेळी स्थलांतरीत झालेल्या सिंधी बांधवांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात आपल्या फाळणीच्या अनुभवांना उजाळा दिला. शासनाच्या आदेशान्वये उल्हासनगर महापालिकेने विभाजन विभिषिका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही हजेरी लावली. फाळणीच्या आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका मुख्यालयात दोन दिवसांचे छायाचित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले.

उल्हासनगर येथे रविवारी विभाजन विभिषिका स्मृती दिवस पाळण्यात आला. उल्हासनगरच्या शहिद अरूणकुमार वैद्य सभागृहात झालेल्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमात फाळणीचा काळ अनुभवलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय तसेच माजी सैनिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. फाळणीचा काळ अनुभवलेल्या देविदास जयसवानी आणि मीना रुपचंदानी यांनी आपले अनुभव कथन केले. फाळणीच्या काळात सिंधी बांधव पाकिस्तानातील सिंध प्रांतातून भारतात आले. आपले कुटुंब, घर, संपत्ती नातेवाईकांना सोडून भारतात येण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय त्यावेळी आव्हानात्मक होता. त्याकाळात सोसलेले हाल, अपेष्टा, निर्वासितांचे नशिबी आलेले जगणे, त्यातून झालेले स्थलांतर आणि नव्या ठिकाणी जगण्याचा संघर्ष असा सगळा घटनाक्रम यावेळी उभा झाला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे महत्व विशद केले. देशाची फाळणी झाली त्यावेळी त्याचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या कमी होत चालली आहे. त्यावेळी या बांधवांनी भोगलेल्या वेदनांची माहिती आताच्या पिढीला नाही. त्यामुळे या पिढीला आपल्या पूर्वजांच्या संघर्षाची कहाणी माहिती व्हावी, यासाठी अशा प्रकारचा स्मृती दिन पहिल्यांदाच देशात आणि राज्यात आयोजित करण्यात आल्याचे यावेळी नार्वेकर म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात निर्वासितांची संख्या सर्वाधिक असल्याने उल्हासनगर शहराची निवड केल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. याप्रसंगी उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार कोमल ठाकूर, स्थानिक आमदार कुमार आयलानी आणि विविध लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

फाळणीच्या आठवणींना उजाळा
उल्हासनगर महापालिका मुख्यालयातील सभागृहात फाळणीच्या आठवणी जागवण्यासाठी विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. फाळणीवेळी घडलेल्या विविध घटनांचे दर्शन यावेळी छायाचित्रातून झाले. फाळणीच्या काळात सिंधी बांधवांनी सहन केलेल्या गोष्टी, त्यांचा प्रवास याची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली. स्वातंत्र्यसेनानी बाबुराव जेरे त्यांच्या पत्नी सुचेता जेरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.