१९६०च्या दरम्यान निर्माण झालेल्या कॉम्प्युटरच्या क्षमतेत अफाट वाढ झाली आणि त्याचा आकार प्रचंड वेगाने कमी होत गेला. परंतु सिलिकॉनच्या छोटय़ा वेफरवर जास्तीत जास्त छोटे घटक बसवण्याच्या आणि आकारमान कमीत कमी करण्याच्या प्रयत्नाला गेल्या काही वर्षांत मर्यादा पडू लागली आहे. कारण हा प्रयत्न (म्हणजे ज्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत ‘टॉपडाऊन अॅप्रोच’ म्हणतात) असाच चालू ठेवला तर यंत्राची अकार्यक्षमता वाढू शकते आणि त्याला कोणताही ग्राहक स्वीकारत नाही. यासाठी शास्त्रज्ञांनी सर्व घटकांचा अविभाज्य भाग असलेल्या tom या घटकाचा अभ्यास आणि त्याच्या वैशिष्टय़पूर्ण मांडणीतून तयार होणारे तंत्र म्हणजे ‘नॅनो टेक्नॉलॉजी’. याचा अभ्यास आणि संशोधन करायला सुरुवात केली. (तंत्रज्ञानाच्या भाषेत ‘बॉटमअप अॅप्रोच’ म्हणतात). या सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानावर पहिले भाष्य केले १९५९मध्ये रिचर्ड फिमन या शास्त्रज्ञाने. त्याचे अतिशय प्रसिद्ध वाक्य ‘there is a plenty of room at the bottom’ हे भविष्य दिशा दर्शवणारे ठरले. १९७० साली बेल लॅबोरेटरीमध्ये एक पदरी अणूंच्या थराचा प्रयोग झाला आणि या तंत्रज्ञानाला गती मिळाली. नॅनो टेक्नॉलॉजीचा गॉडफादर मानल्या जाणाऱ्या एरिक ड्रेक्सलर याच्या १९८० सालातील संशोधन भाषणाने अनेक शास्त्रज्ञांना प्रभावित केले आणि मग ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ या जाणिवेने नॅनो तंत्रज्ञानाचा पाठपुरावा सुरू झाला.
आपल्याला असे दिसून येते की कोणतेही तंत्रज्ञान प्रगत होण्यासाठी त्या तंत्रज्ञानात जास्तीत जास्त संशोधन होणे आवश्यक असते. आजच्या घडीला संशोधन आणि जगातील प्रमुख राष्ट्रांनी त्यामध्ये केलेली गुंतवणूक यावर सहज नजर टाकली तर असे दिसून येते की ही राष्ट्रे एकूण जीडीपी रकमेच्या काही विशिष्ट टक्के गुंतवणूक संशोधनात करीत आहेत. उदा. ४.३६ टक्के दक्षिण कोरिया, ३.९३ टक्के इस्रायल, ३.६७ टक्के जपान, २.७० टक्के अमेरिका, २.३० टक्के जर्मनी, १.८४ टक्के चीन, १.७० टक्के इंग्लंड, १.१२ टक्के रशिया अशी ही गुंतवणूक आहे, तर भारतात ती केवळ ०.९ टक्के इतकी आहे. यातील अनेक राष्ट्रे नॅनो टेक्नॉलॉजीच्या अद्ययावत तंत्रज्ञान अभ्यासासाठी आणि विकासासाठी मोठय़ा प्रमाणात काम करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर भारतातील ४१ विद्यापीठांतून या शास्त्राचा अभ्यासक्रम शिकवला जात आहे, ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे. या तंत्रज्ञानातील संशोधनासाठी विशिष्ट प्रकारच्या प्रयोगशाळांची गरज असते. या प्रयोगशाळांचा खर्च त्याचे व्यवस्थापन तंत्रशुद्ध आणि आव्हानात्मक असते. त्यासाठी भारतात आयआयटी मुंबई येथे २००६ मध्ये ‘सेन्टर ऑफ एक्सलन्स इन नॅनो इलेक्ट्रॉनिक्स’ (सीईएन) या वैशिष्टय़पूर्ण प्रयोगशाळेची निर्मिती झाली. यामुळे नॅनो टेक्नॉलॉजी, स्पिनट्रॉनिक्स, ओप्तो इलेक्ट्रॉनिक, मेम्स, सोलर फोटोवोल टाइक सेल अशा महत्त्वपूर्ण विषयातील नवीन संशोधनाचे डिझाइन, फॅब्रिकेशन आणि त्याचे कॅरेक्टरायझेशन भारतात करणे आता शक्य आणि सुलभ झाले आहे. आयआयटी, मुंबई आणि आयआयटी, बंगळुरू यांच्या समन्वयातून साकार होणाऱ्या या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे आर्थिक साहाय्य मिळते. या सुविधा ऑगस्ट २००८ ते जानेवारी २०१४ या कालावधीतील पहिला टप्पा आणि मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१९ मध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आयआयटी मुंबईला मिळत आहेत. भारतातील अनेक संस्थांमधील अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना संशोधनासाठी या प्रयोगशाळांचा उपयोग करता आला आहे.
या प्रयोगशाळांमध्ये संशोधनाचे काम करण्यासाठी प्रस्ताव द्यावा लागतो. हा प्रस्ताव एक आठवडा ते १२ आठवडे किंवा तीन महिने ते २४ महिने या स्वरूपात देता येतो. सीईएन या प्रयोगशाळेची माहिती व्हावी यासाठी छोटय़ा कालावधीची कार्यशाळा संशोधकाने करावी ही अपेक्षा असते. ज्या संशोधकांचे प्रस्ताव निवडले जातात, त्यांना प्रशिक्षण दिले जाते. कारण या प्रयोगशाळेत काम करण्यासाठी अनेक प्राथमिक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते.
प्रस्ताव निवडून काम सुरू करण्याआधी चार ऑनलाइन चाचण्या द्याव्या लागतात आणि त्यामध्ये शंभरपकी शंभर मार्क मिळवणे आवश्यक असते. त्यानंतरच प्रयोगशाळेत प्रवेश करण्याची बायोमेट्रिक सुविधा मिळविता येते. आयआयटी मुंबईच्या http://www.inup.iitb.ac.in/inup/index.php या संकेतस्थळावर या सुविधांची संपूर्ण माहिती मिळू शकते. . या संदर्भात २३ मार्च ते २७ मार्च २०१५ या दरम्यान एक प्रशिक्षण कार्यशाळा आयआयटी, मुंबईमध्ये होणार आहे.. मग आता गरज आहे ती फक्त प्रबळ इच्छाशक्तीची !!
प्रा. कीर्ती आगाशे -musickirti@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2015 रोजी प्रकाशित
सुविधा.. नॅनो टेक्नॉलॉजी संशोधनाची!
विसाव्या शतकात अद्भुत कल्पना वाटणारे ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ हे शास्त्र एकविसाव्या शतकातील आघाडीचे तंत्रज्ञान बनत आहे.

First published on: 25-02-2015 at 12:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Research on nano technology