डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा, नवनवीत नगर, लोढा हेरिटेज भागातील सोसायट्यांच्या आवारात रात्रीच्या वेळेत येऊन तेथील दुचाकींमधील पेट्रोल चोरुन काळ्या बाजारात विकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला लोढा हेरिटेजमधील रहिवाशांनी दोन दिवसापूर्वी पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन असल्याने आणि त्याच्या शिक्षणाचा विचार करुन पोलिसांनी त्याला पुन्हा असा प्रकार करणार नाही या हमीपत्रावर सोडले.
लोढा हेरिटेज, नवनीत नगर, देसलेपाडा भागातील सोसायटी, रस्त्यावर, चाळींच्या समोर उभ्या असलेल्या दुचाकींमधील पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले होते. सकाळच्या वेळेत दुचाकी स्वार कामावर जाण्यासाठी दुचाकी सुरू करू लागला की दुचाकीमध्ये पेट्रोल नसल्याचे दिसून येत होते. या भागातील एका दुचाकी स्वाराने आदल्या दिवशी पेट्रोल टाकी पूर्ण भरुन घेतली होती.

दुसऱ्या सकाळी कामावर जाताना त्यांना टाकी पूर्ण खाली असल्याची दिसली. आजुबाजुला पेट्रोल सांडले नसताना पेट्रोल गेले कोठे असा प्रश्न निर्माण झाला. चोरटे हा प्रकार करत असल्याच्या सोसायटीमधील अनेक दुचाकी स्वारांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. लोढा हेरिटज सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक तरुण दुचाकी मधील पेट्रोल काढत असल्याचे मध्यरात्रीच्या वेळेत दिसत होते. लोढा हेरिटेज सोसायटी आवार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. रहिवाशांनी रात्रीच्या वेळेत सोसायटी आवारात सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली. त्यात एक तरुण रात्रीच्या वेळेत सोसायटी आवारात आला. त्याने एका दुचाकी मधून पेट्रोल काढण्यास सुरुवात करताच सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेऊन असलेल्या कुणाल वाघमारे आणि रोहित या रहिवाशांनी जाऊन तरुणाला पकडले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. कुणाल, रोहित यांनी त्याला पकडून ठेवले.

हेही वाचा : डोंबिवलीत भोपर रस्ता कमानीच्या कामासाठी २५ दिवसांपासून बंद ; नोकरदार, विद्यार्थी, नागरिकांचे हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर रहिवाशी जमल्यानंतर त्याने आपण इयत्ता अकरावी इयत्तेत शिकतो. आपण असा प्रकार यापुढे करणार नाही, आपणास सोडून द्या, असे त्याने सांगितले. रहिवाशांनी त्याच्या पालकांना कळविण्याचा निर्णय घेतला. हा तरुण लोढा पलावा भागात राहत होता. त्याने आपल्या कुटुंबीयांना काही कळवू नका अशी विनंती केली. रहिवाशांनी त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीचा विचार करुन समज देऊन त्याला सोडून दिले. या तरुणाने आपण यापूर्वी असा पेट्रोल चोरीचा प्रकार केला होता, अशी कबुली रहिवासी आणि पोलिसांना दिली. झटपट श्रीमंत होणे, मौजमजेसाठी, आपल्या मैत्रिणीवर पैसे उधळण्यासाठी हे तरुण असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.