डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने रहिवासी हैराण आहेत. उमेशनगर भागात महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा किमती ऐवज लुटण्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहेत. विष्णुनगर पोलिसांनी रेतीबंदर, गणेशनगर खाडी किनारा, उमेशनगर भागातील गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

डोंबिवली पश्चिमेत उमेशनगर भागातून एक महिला घटनेच्या दिवशी रात्री दहा वाजता पायी घरी चालली होती. उमेशनगर बाजारपेठ आणि गर्दीचा परिसर आहे. या महिलेच्या हातामध्ये सामानाच्या पिशव्या होत्या. या भागात पाळत ठेऊन असलेल्या दोन भुरट्या चोरट्यांनी संबंधित महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र, सोनसाखळी असल्याचे हेरले. तिचा दुचाकी वरून पाठलाग करत ती गर्दीतून बाहेर पडून रस्त्याच्या एक कोपऱ्यावरून एकटी जात असताना, दुचाकी स्वार वेगाने त्या ५२ वर्षाच्या महिलेच्या अंगावर आले. दुचाकी झपकन अंगावर आल्याने महिला जोराने ओरडली. घाबरलेली असल्याने या गडबडीत दुचाकीवरील भुरट्या चोरांनी महिलेच्या गळ्यातील चार लाख रूपये किमतीचं मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून पळून गेले. या महिलेच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गणेश वडणे तपास करत आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी उमेशनगर मासळी बाजारात रात्रीच्या वेळेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून नेण्यात आला होता. गरीबाचापाडा, कुंभारखाण पाडा भागात असे प्रकार नेहमी घडतात, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

डोंबिवली पश्चिमेत रेतीबंदर मोठागाव, कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात खाडी किनारा आहे. या भागात सकाळ, संध्याकाळी रहिवासी फिरण्यासाठी येतात. यामध्ये अनेक महिला असतात. या संधीचा गैरफायदा भुरटे चोर घेतात, असे या भागातील जागरूक रहिवाशांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.