कल्याण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील लसीकरण, करोना रुग्णांचा उपचारी दर यांचे निकष अद्याप पूर्ण केले नसल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील करोना प्रतिबंध नियमांचे यापूर्वीचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी, आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट यामुळे कायम राहणार आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने हे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. पालिकेच्या निर्बंध कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पालिका क्षेत्रात करोना लशीची पहिली मात्रा ९० टक्क्याहून अधिक, दुसरी मात्रा ७० टक्केहून अधिक, करोना रुग्णांचा उपचारी दर १० टक्क्यांपेक्षा कमी, प्राणवायू रुग्णशय्येवरील रुग्ण ४० टक्क्यांपेक्षा कमी पाहिजेत. अशा पालिका प्रशासकीय घटकाला निर्बंधातून वगळण्याचा निर्णय दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या निकषांमध्ये कल्याण डोंबिवली शहरे बसत नसल्याने पालिकेने पालिका हद्दीतील करोना प्रतिबंधाचे यापूर्वीचे सर्व निर्बंध कायम ठेवले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक ठिकाणचे राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह सोहळे याठिकाणी ५० टक्के आणि आसन क्षमतेच्या २०० जणांना उपस्थितीची परवानगी असेल. घरपोच वस्तू सेवा सुरळीत राहिल. शालेय वर्ग पूर्ण क्षमतेने भरतील. शाळेत शासन आणि शिक्षण विभागाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. क्रीडांगणे, क्रीडासंकुले, नाट्यगृह, चित्रपटगृह, जीम, तरण तलाव, धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. खासगी, शासकीय आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.