उल्हासनगर : अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणाच्या भूसंपादन प्रक्रियेत मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून मोबदल्याचा अपहार केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक झाली आहे. मात्र यात आता एका निवृत्त नायब तहसीलदार दर्जाच्या कर्मचाऱ्याचीही चौकशी सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. हा कर्मचारी काही महिन्यांपूर्वी निवृत्त होऊनही कार्यालयाच्या आवारात त्याचा वावर होता. प्रक्रियेची माहिती असल्याने यात त्याचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. 

पाण्याचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धरणाची उभारणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बनावट कागदपत्रे सादर करून मृत व्यक्तीच्या नावे मोबदला मिळवण्याचा प्रयत्न येथील भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी हाणून पाडला. कागदपत्रांच्या छाननीत संशय आल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

जयराज कारभारी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे यात १४ जणांना अटक केली. याच महिन्यात कुशिवली येथील भूसंपादनाचा ४७ लाखांचा मोबदला मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून लाटल्याचे समोर आले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करत या प्रकरणी ३० जणांना अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच २१ मे रोजी पुन्हा अशाच आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.

या वेळी मृत आदिवासी व्यक्तीसोबतच हयात असलेल्या दोघांच्या नावाने १६ लाखांचा मोबदला लाटण्यात आला आहे. त्यामुळे एका मोठय़ा टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने हा प्रकार केल्याचा संशय बळावला आहे.

तसेच सुरुवातीपासूनच या भूसंपादन प्रक्रियेत उपविभागीय कार्यालयातील काही व्यक्ती सहभागी असण्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्या संशयाला आता बळ मिळत असून एका निवृत्त नायब तहसीलदार दर्जाच्या कर्मचाऱ्याची याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. निवृत्तीनंतरही हा कर्मचारी कार्यालयात फेऱ्या मारायचा. करार पद्धतीने त्याच्यावर काही जबाबदारी देण्यात आली होती.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी पहिला गुन्हा दाखल केल्यानंतर हा एकाएकी गायब झाला. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली

आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात काही तत्कालीन लोकप्रतिनिधीही सहभागी असण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

पहिले प्रकरण छाननीत समोर आल्यानंतर इतर प्रकरणांचा उलगडा झाला. या सर्व प्रकरणात गुन्हे दाखल केले जात असून आरोपींना अटकही होत आहे. एका निवृत्त कर्मचाऱ्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जे दोषी असतील त्यांना कठोर शासन होईल. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर