डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा गणेशघाट विसर्जन भागात उल्हास खाडी किनाराचा भाग बेकायदा भराव करून तेथे बांधकामाची आखणी करणाऱ्या भूमाफियांच्या विरुध्द महसूल अधिकाऱ्यांनी चांगलाच फास आवळला आहे. महसूल, वन, कांदळवन, पोलीस, पालिका अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा बेकायदा भराव केल्या प्रकरणाची पाहणी करून हा भराव करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे गेल्या वर्षापासून काही भूमाफिया खाडी किनारा परिसरातील खारफुटीची जुनाट झाडे तोडून तेथे मातीचे बेकायदा भराव करून बेकायदा बांधकाम करण्याची आखणी करत आहेत. गेल्या वर्षी हा प्रकार महसूल अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी तेथे पाहणी करून याप्रकरणी तहसीलदार सचिन शेजाळ यांना अहवाल दिला. वरिष्ठांच्या आदेशावरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात स्थानिक मंडळ अधिकारी यांच्या तक्रारीवरून हा बेकायदा भराव केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू असतानाच, गेल्या महिन्यात पालिका, महसूल अधिकाऱ्यांच्या बांधकाम किंवा माती भराव करण्याच्या कोणत्याही परवानग्या न घेता भूमाफियांनी रात्रंदिवस काम करून देवीचापाडा खाडी किनारा भागातील खारफुटीची झाडे तोडून तेथे मातीचे भराव केले आहेत.
एक गु्न्हा दाखल असताना भूमाफिया पुन्हा असे प्रकार करत असल्याने महसूल अधिकारी हैराण झाले. जागरूक नागरिकांनी नव्याने करण्यात आलेल्या खाडीतील भराव प्रकरणी पु्न्हा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. अधिकाऱ्यांनी भराव जागेची पाहणी करून तहसीलदारांना अहवाल पाठविला. या अहवालानंतर पुन्हा महसूल अधिकाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या एका समितीला बेकायदा भराव प्रकरणाची पाहणी करण्यासाठी पाचरण केले. या पाहणी पथकात देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले, साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, महसूल, कांदळवन आणि वन अधिकारी, मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे, ग्राम महसूल अधिकारी अरूण कासार उपस्थित होते.
भूमाफियांनी खारफुटी नष्ट करून खाडीपात्रात बेकायदा भराव केल्याचा निष्कर्ष पाहणी पथकाने काढला. यासंदर्भात एक अहवाल तयार करून तो तहसीलदारांना पाठविण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा बेकायदा भराव करणाऱ्या अज्ञात इसमाविरुध्द गु्न्हा दाखल होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. असे गुन्हे दाखल करून पुढे त्याचा तपास योग्यरितीने होतो की नाही याचा पाठपुरावा करून महसूल अधिकाऱ्यांनी करून या बेकायदा भराव प्रकरणातील भूमाफियांना अटक आणि त्यांना पुढे कठोर शिक्षा होईल यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.
देवीचापाडा येथे खाडी पात्राजवळ बेकायदा मातीचा भराव केल्याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी अहवाल प्राप्त झाला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. याप्रकरणाचा योग्यरितीने तपास करून संबंधितांवरील कारवाईसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सचिन शेजाळ तहसीलदार.