कल्याण – कल्याण-डोंबिवली परिसरातील रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रिशन करताना मोटार वाहन निरीक्षक आणि मीटर रिकॅलिब्रिशन करणारे खासगी केंद्र चालक मीटरमध्ये अनावश्यक त्रुटी काढत आहेत. रिक्षा चालकांकडून चढे शुल्क आकारत आहेत. मीटर रिकॅलिब्रिशन केल्यानंतर वस्तू व सेवा कराची पावती खासगी केंद्र चालकाने रिक्षा चालकांना देणे बंधनकारक आहे. या अटींची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे अशा केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी डोंबिवलीतील रिक्षा चालक मालक संघटना आणि कल्याणमधील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याकडे सोमवारी करण्यात आली.

रिक्षा मीटर रिकॅलिब्रिशन परिवहन विभागाच्या सूचनेप्रमाणे होणे आवश्यक आहे. परंतु उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक आणि रिकॅलिब्रिशन खासगी केंद्र चालक संगनतमाने रिक्षा मीटरमध्ये अनावश्यक त्रृटी काढतात. या सगळ्या प्रकारात रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. रिक्षा चालक प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय बंद ठेऊन रिकॅलिब्रिशनसाठी केंद्रावर आलेला असतो. त्याचा कोणताही विचार न करता त्याला तेथे उपद्रव दिला जात असल्याच्या तक्रारी कल्याणच्या रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर, कार्याध्यक्ष संतोष नवले, सचिव विलास वैद्य, उपाध्यक्ष जितेंद्र पवार, डोंबिवलीतील रिक्षा चालक मालक संघटनेचे अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, भिकाजी झाडे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केल्या आहेत.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात सुमारे ७४ हजार रिक्षा आहेत. यामधील सात ते आठ हजार रिक्षांचे रिकॅलिब्रिशन झाले आहे. प्रत्येक रिक्षा चालकाला रिकॅलिब्रिशन करताना पक्की पावती, वस्तू व सेवा कराची पावती देण्यात यावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. यापूर्वी रिक्षा मीटर रिकॅलिब्रिशन करताना विलंब शुल्काच्या निनावी नक्कल पावत्या तयार करण्यात येऊन याप्रकरणात शासन, रिक्षा चालकांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणाची परिवहन विभागस्तरावर त्यावेळी चौकशीही झाली होती. त्यामुळे असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मीटर रिकॅलिब्रिशन पारदर्शकपणे करण्यात यावे, अशी मागणी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात मे. हिरा रिकॅलिब्रिशन या अधिकृत सेंटरमार्फत मीटरचे रिकॅलिब्रिशन केले जात आहे. रिकॅलिब्रिशन केल्यानंतर रिक्षा चालकाला वस्तू व सेवा करासह पावती देण्यासाठी संबंधित सेंटर चालकाला नोटीस बजावली आहे. रिकॅलिब्रिशन करताना कोणताही गैरप्रकार होत नाही. नियमानुसार सर्व प्रक्रिया केल्या जात आहेत. – आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.