डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वदर्ळीच्या बापूसाहेब फडके रस्त्यावर रविवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान बाजीप्रभू चौकात रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून असलेल्या एका रिक्षा चालकाने एका दुचाकी स्वाराच्या कपाळावर पेव्हर ब्लाॅक मारून त्यांना गंभीर जखमी केले. आणि त्यांना पुढे आपल्याशी पंगा घेतला तर जीवे मारण्याची धमकी दिली.

रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. रिक्षा चालकाने दुचाकी स्वाराच्या पत्नी आणि लहान मुला समक्ष दुचाकी स्वाराला बेदम मारहाण केली. शिवम कैलास पवार (२१) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका येथील एस. बी. शेलार कार्यालयामागील भागात राहतात. ते रिक्षेने प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात.

गणेश हनुमंत इदाते (३६) असे तक्रारदार दुचाकी स्वाराचे नाव आहे. ते कार चालक आहेत. ते आपल्या कुटुंबीयांसह डोंबिवली पश्चिमेतील टेलकोसवाडी भागात राहतात. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तक्रारदार गणेश इदाते आपल्या दुचाकीवर पत्नी आणि लहान मुलाला घेऊन खरेदीसाठी डोंबिवली पूर्व भागात बापूसाहेब फडके रस्ता भागात आले होते. खरेदी झाल्यानंतर ते फडके रस्त्याने बाजीप्रभू चौकातून घरी निघाले होते.

बाजीप्रभू चौकातून तक्रारदार गणेश इदाते आपल्या दुचाकीवरून पत्नी आणि मुलासह जात असताना बाजीप्रभू चौकात रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा चालक शिवम पवार यांंनी वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने रिक्षा उभी करून ठेवली होती. इतर वाहन चालक शिवम पवार यांच्या रिक्षेला वळसा घाऊन पुढे जात होती. शिवम यांनी रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी उभी करून ठेवल्याने इतर मोठी वाहने त्या भागातून पुढे जाऊ शकत नव्हती.

शिवम पवार यांच्या रिक्षेचा तक्रारदार गणेश इदाते यांना अडथळा वाटू लागला. त्यामुळे त्यांनी रिक्षा चालक शिवम पवार यांना रिक्षा रस्त्याच्या मध्यभागाहून काढून एका बाजुला घेण्याची सूचना केली. या सूचनेचा राग येऊन शिवम यांनी गणेश यांना शिवागाळ करून तू मला रिक्षा बाजुला घेण्याची सूचना करणारा कोण, असे प्रश्न करून गणेश यांच्या बरोबर भांडण सुरू केले. आणि यावेळी रिक्षा चालक शिवम पवार यांनी ठोशाबुक्क्यांनी गणेश यांना मारहाण केली.

रस्त्याच्या बाजुला पडलेला पेव्हर ब्लाॅकचा तुकडा उचलून तो गणेश इदाते यांच्या कपाळावर मारला. या माराने गणेश यांच्या कपाळाला दुखापत झाली. गणेश यांच्या पत्नी आणि लहान मुलासमक्ष शिवम पवारने त्यांना मारहाण केली. आता पुन्हा आपल्या मागे लागला तर जीवे मारण्याची धमकी दिली. डोंबिवली, कल्याणमध्ये दर आठवड्यावर रस्ते अडवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सात ते आठ रिक्षा चालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. तरीही रिक्षा चालक ऐकत नसल्याने पोलीसही त्रस्त आहेत.