शहरातील रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी अनेक ठिकाणी खोदकामे सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असतानाच, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी ठाण्याच्या सॅटीस पुलावर बस बंद पडल्याने कोंडीत भर पडल्याचे दिसून आले. बस बंद पडल्याने ठाणे रेल्वे स्थानक ते कोर्टनाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका या मार्गाला जोडणाऱ्या बाजारपेठ, जांभळीनाका, टेंभीनाका परिसरातील मार्गांना बसून याठिकाणीही कोंडी झाली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कोंडीचा सामना करावा लागल्याने ठाणेकरांमधून नाराजीचा सुर उमटत होता.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी रस्ते नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहेत. दररोज सकाळ आणि रात्रीच्या वेळेत शहरात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. सोमवारी देखील तीन हात नाका येथून मुलंड चेकनाका रोडच्या दिशेने शहरात वाहतूक कोंडी झाली होती. या भागात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले आहेत. याच मार्गावर मेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत वागळे इस्टेट, मुलुंड, भांडूप तसेच मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.
हेही वाचा – ‘आरोग्य व शिक्षणासाठी शासकीय खर्च होणे गरजेचे’; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
राबोडी जवळील के व्हिला येथील नाल्याच्या बांधकामासाठी रस्ता खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे टेंभीनाका, उथळसर मार्गावर वाहनांचा भार येऊन कोंडी होऊ लागली आहे. पोलीस आयुक्तालयाजवळील रस्ताही खोदण्यात आला आहे. त्यामुळे कळवा पूल ते प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. असे असतानाच, ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील सॅटीस पूलावर राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस बंद पडल्याने सोमवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानक ते कोर्टनाकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर, तलावपाली, जांभळीनाका, कोर्टनाका भागात जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या टीएमटी बसगाड्या, एसटी महामंडळाच्या बसगाड्याही वाहतूक कोंडीत अडकून होत्या. अवघ्या ५ ते १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा ते पाऊण तासाचा अवधी लागत होता. या कोंडीमुळे काही चालकांनी बाजारपेठेतून वाहतूक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला होता.