आता आठ पदरी रस्ता
किशोर कोकणे, लोकसत्ता
ठाणे : अवजड वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला होता. त्यानुसार या मार्गावरील माजिवाडा ते वडपे गावापर्यंत आठ पदरी रस्ता तयार करण्याच्या कामाला आठ दिवसांत सुरुवात होणार असून दोन वर्षांत हा रस्ता तयार केला जाणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे महामार्ग कोंडीमुक्त होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावरून दररोज हजारो वाहने वाहतूक करतात. भिवंडीमधील गोदामांतील वाहनांची वाहतूक या महामार्गावरून सुरू असते. तसेच उरण येथील जेएनपीटी बंदरातून नाशिक, गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. वाहनांची संख्या अधिक आणि तुलनेत हा रस्ता अपुरा पडत असल्याने गेल्या काही वर्षांपासून हा मार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावर होणाऱ्या कोंडीचा फटका ठाणे, घोडबंदर, मुंब्रा, शीळफाटा आणि भिवंडी शहरातील वाहतुकीला बसत आहे. यंदाच्या पावसाळय़ात या मार्गावर खड्डे पडल्यामुळे कोंडीत भर पडली.
या मार्गावरील कोंडीची समस्या सोडविण्यासाठी हा रस्ता आठ पदरी करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता. तसा प्रस्तावही या विभागाने तयार केला होता. हे काम राज्य रस्ते विकास महामंडळ करणार असून त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण निधी देणार आहे. परंतु या कामाला गती मिळत नव्हती. याच मार्गाला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग येत्या काही वर्षांत तयार होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा भारही या मार्गावर येणार आहे. हा मार्ग सध्या चार पदरी असून समृद्धी महामार्गाचा भार वाढल्यास माजीवडा, खारेगाव परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे माजीवडा-वडपे या मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजनही झाले. मात्र करोना संकट आणि पाऊस यांमुळे हे काम सुरू होऊ शकले नव्हते, असा दावा संबंधित विभागाकडून केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर होणाऱ्या कोंडीनंतर हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला असून येत्या आठवडय़ाभरात या रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ने घेतला आहे.
मार्ग असा असेल..
* माजीवडा ते वडपे असा आठ पदरी आणि २३ किलोमीटर लांब रस्ता असणार आहे.
* १ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून केंद्र सरकारच्या मदतीने एमएसआरडीसी या रस्त्याचे बांधकाम करत आहे.
* या रस्त्याच्या कामामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सुरुवातील जुन्या रस्त्याला लागून दोन्ही दिशेला दोन-दोन पदरी नव्या मार्गिका आणि दोन्ही दिशेला सेवा रस्ते बांधले जातील.
* या मार्गिका तयार झाल्यानंतर मुख्य मार्गिकांचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गिकेवरील वाहतूक नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यावरून सोडली जाईल.