उमेशनगरमधील रहिवासी, व्यापारी धुळीने हैराण

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव माणकोली खाडी उड्डाण पूल ते रेतीबंदर रेल्वे फाटक-उमेशनगर (रोकडे इमारत) या तेराशे मीटर लांब असलेल्या तसेच १५ मीटर रुंदीच्या रस्ते बांधणी कामाला कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. सुमारे एक कोटी २० लाख रुपये खर्चाचे हे काम आहे. माणकोली उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने पुलावरील वाहतूक डोंबिवली दिशेने सुरू झाल्यानंतर रेतीबंदर खाडी-नवनाथ मंदिर-रेतीबंदर रेल्वे फाटक ते उमेशनगरमधील रोकडे इमारतीपर्यंतच्या पुनर्पृष्ठीकरणाचे काम करणे अवघड होईल. त्यामुळे पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना महापालिकेने या रस्त्याचे डांबरीकरण आणि पुनर्पृष्ठीकरणाचे काम सुरू केले आहे. या रस्त्यावरील डांबरीकरणाचा थर काढून टाकण्यात आला आहे. जेसीबीच्या साहाय्याने डांबराचा थर काढताना अनेक ठिकाणी रस्त्याखालून जलवाहिनी, सेवा वाहिन्या गेल्या असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. या वाहिन्या रस्ता तयार करताना अडथळा ठरणार असल्याने त्या वाहिन्या रस्ते काम सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करणे, जेथे जलवाहिन्या फुटल्या आहेत तेथील दुरुस्ती करून घेणे, काही ठिकाणी रस्त्याकडेची गटारे, मलवाहिन्या फुटल्या आहेत. ती बांधून घेण्याची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. रेतीबंदर खाडी ते उमेशनगर हा विकास आराखडय़ातील १५ मीटर रुंदीचा रस्ता आहे.

दिल्ली-जेएनपीटी समर्पित जलद मालवाहू रेल्वे मार्गिका रेतीबंदर मोठागाव मधून जात आहे. या कामासाठी रेतीबंदर रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विरार-अलिबाग द्रुतगती महामार्ग याच भागातून जात आहे. या जलदगती रेल्वे, रस्ते मार्गाला रेल्वे फाटक किंवा स्थानिक वाहतुकीचा अडथळा नको म्हणून रेतीबंदर रेल्वे फाटकात मोठागाव ते उमेशनगरमधील रोकडे इमारतीपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. रेल्वे आणि पालिका यांच्यातर्फे या पुलाचे काम करण्यात येणार आहे. या पुलामुळे दिल्ली-जेएनपीटी मालवाहू मार्ग, दिवा-वसई-डहाणू शटल सेवेचा मार्ग मोकळा होणार आहे. ठाणे, मुंबईकडून माणकोली उड्डाण पुलावरून येणाऱ्या प्रवाशांना मोठागाव, रेतीबंदर परिसरातून येताना रेतीबंदर फाटकाचा आताचा अडथळा असणारा दूर होणार आहे. रेतीबंदर फाटकाच्या नवनाथ मंदिर खाडी बाजूला आणि उमेशनगरमधील रोकडे इमारतीपर्यंत पुलाचा सुमारे तीन मीटर लांबीचा पोहच रस्ता असणार आहे. रेल्वे फाटकामुळे सध्या वाहन चालकांना लांब पल्ल्याची गाडी, मालगाडी जाईपर्यंत २० मिनिटे खोळंबून राहावे लागते. येत्या दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होऊन फाटकाचा अडथळा दूर होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उमेशनगरमध्ये धुळीचे लोट

रेतीबंदर फाटक ते उमेशनगर रोकडे इमारतीपर्यंत रस्त्यावरील डांबराचा थर जेसीबीने उकरला आहे. या खडबडीत रस्त्यावरून येजा करताना वाहनांची धूळ सतत उडत असल्याने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. दुचाकीवरून येजा करणारे वाहन चालक, या रस्त्याच्या दुतर्फा असणारे व्यापारी, किराणा दुकानदार या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने हैराण आहेत. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे.