ठाणे : जिल्हयातील बेघर, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागातर्फे सुरू करण्यात आलेला फिरत्या शाळेचा उपक्रम गेल्या नऊ महिन्यांपासून निधी अभावी बंद होता. यामुळे अनेक गरजू मुलांचे शिक्षण थांबले होते. याबाबत लोकसत्ता ठाणेने सातत्याने वृत्तांकन देखील केले होते. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून राज्यातील अशा २९ महापालिकेतील फिरती शाळा सुरु होणार असून यासाठी शासनाच्या माध्यमातून ८ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शक्य होणार आहे.
राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे बेघर मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी जिल्ह्यात फिरती शाळा उपक्रम हाती घेण्यात आला. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये एकत्रितरीत्या हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या देखरेखीखाली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत होता. यात एका बसद्वारे मुलांना त्यांच्या राहत्या विभागात जाऊन शिक्षण दिले जाते. यात प्रामुख्याने झोपडपट्टी विभाग, उड्डाणपूल, सिग्नल या ठिकाणी राहणारी मुले यांना शिक्षण देण्यात येत होते. यासाठी संस्थेच्या माध्यमातून नियुक्त केलेले शिक्षण विद्यार्थ्यांना नियमित स्वरूपात शिक्षण देत होते. आरंभी सहा ते सात महिन्यांच्या काळात नियमित स्वरूपात निधी आला.
मात्र, त्यानंतर पैशांअभावी जिल्हा प्रशासनाला हा प्रकल्प बंद करावा लागला. यामध्ये देखील ठाणे जिल्ह्यातील प्रवास संस्थेच्या माध्यमातून काही महिने स्व- खर्चावर हा प्रकल्प चालू ठेवला. मात्र काही महिन्यानंतर संस्थेचे देखील आर्थिक गणित बिघडू लागल्याने त्यांना नाईलाजाने फिरती शाळा उपक्रम बंद करावा लागला. याबाबत संस्थेच्या माध्यमातुन सातत्याने पाठपुरावा देखील सुरु होता. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या राज्यमंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून राज्यातील अशा २९ महापालिकेतील फिरती शाळा सुरु होणार असून यासाठी शासनाच्या माध्यमातून ८ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. यामुळे हा उपक्रम पुन्हा सुरु होणार असून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार आहे.
या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात १७० बालकांना शाळेत प्रवेश करून देण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ४५० ते ५०० बालकांना शैक्षणिक वर्षात पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला होता. यामुळे आता हा उपक्रम पुन्हा सुरु झाल्यास गरजू विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण घेणे सोपे होणार असल्याचे मत, प्रवास संस्थेचे विकास जे. यांनी व्यक्त केले आहे.