ठाणे : ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याणमधील नितीन घोले (४९) याला खंडणी प्रकरणी अटक केली आहे. एका हाॅटेल व्यवसायिकाकडून त्याने खंडणी मागितली होती. ५० हजार रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी त्याला हातोहात पकडले. नितीन हा माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवत असे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे कल्याणमधील एका हाॅटेल व्यवसायिकाने तक्रार अर्ज केला होता. नितीन घोले हा कल्याणमधील हाॅटेल व्यवसायिकांविरुद्ध खोट्या तक्रारी करुन धमकावत असून तो त्यांच्याकडून खंडणीची मागणी करत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी कल्याण येथील संतोष हाॅटेल परिसरात सापळा रचला. दरम्यान, नितीन हा सोमवारी रात्री ११.५५ वाजता खंडणी घेण्यासाठी आला असता, पोलिसांच्या पथकाने त्याला ५० हजार रुपये घेताना ताब्यात घेतले.

त्याच्याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८ (२), ३०८ (३), ३०८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर त्याच्या एका साथिदाराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. नितीन याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ता म्हणून वावरत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याने पोलीस, इतर शासकीय अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने अशाप्रकारे इतरही हाॅटेल व्यवसायिकांकडून खंडणी घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे खंडणी विरोधी पथकाला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे घोले विरोधात आणखी काही तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई ठाणे पोलिसांचे अपर पोलीस आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त (शोध- २) विनय घोरपडे, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, साहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गोरे, पोलीस हवालदार कानडे, शिंदे, हिवरे, पोलीस नाईक हासे, पोलीस शिपाई ढाकणे यांनी केली.