पाच मोठय़ा प्रकल्पांचा समावेश; अंमलबजावणी तिसऱ्या टप्प्यात

जयेश सामंत, सागर नरेकर

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यात ग्रामीण भागातील पाच मोठय़ा प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार असल्यामुळे हे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी किमान २० वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

‘एमएमआरडीए’ने मंजुरी दिलेल्या सर्वंकष परिवहन अभ्यासानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी या भागातील वाहतूक व्यवस्था सदृढ करण्यासाठी विविध प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. नेमलेल्या सल्लागाराने या अभ्यासामध्ये प्रस्तावित प्रकल्पांचे प्रवासी मागणी नमुना पद्धतीमध्ये विश्लेषण केले आहे. यात सेवेचा स्तर आणि त्यावर अवलंबित भार याचे गुणोत्तर करण्यात आले आहे. त्यानुसार हे प्रकल्प कोणत्या टप्प्यात आणि कशाप्रकारे अंमलात आणता येतील याचेही नियोजन करण्यात आले आहे. यात २०२६, २०३१ आणि २०४१ असे तीन कालावधीचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. तीन हात नाका वळण उड्डाणपूल, आनंद नगर टोल नाका (कोपरी) ते साकेत रोड, तुर्भे- तळोजा उसाटणे रस्ता आणि कल्याण ते बापगाव या चार प्रकल्पांचा  समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्यात कोलशेत ते काल्हेर कासारवडवली ते खारबाव, पूर्व द्रुतगती महामार्गाचा विस्तार आणि ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचा समावेश आहे. २०३२ ते २०४१ पर्यंत जुना आग्रा मार्ग ते मुलुंड टोल नाका या रस्त्याच्या सागरी रस्त्याचा आणि कोपरी ते पाटणी या पुलाच्या विस्ताराच्या प्रकल्पाचा आवश्यक प्रकल्पांमध्ये समावेश आहे. शहरी भागातील जवळपास सर्वच प्रकल्प २०४१ पर्यंत पूर्ण होतील.

त्याचवेळी शिळफाटा, दिवा, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, पडघा या भागातील प्रकल्पांना मात्र  २०४१ नंतरच्या प्रकल्पांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यात दिवा मार्गे जाणारा शिळफाटा ते माणकोली रस्ता, कल्याण – एनआरसी कंपनीकडून टिटवाळा जाणारा रस्ता, टिटवाळा ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  तीनला जोडणारा पडघापर्यंतचा मार्ग, दहिसर ते मुरबाड रोड आणि गायमुख ते पायेगाव रस्त्याचा समावेश आहे.

ठाण्यापुढील मार्गाची गरज

दिवामार्गे शिळफाटा ते माणकोली मार्गामुळे नवी मुंबई, शिळ भागातून भिवंडी गाठण्यासाठी कळव्याला वळसा मारून जाण्याची  गरज पडणार नाही. यात अवजड वाहनांची  संख्या सर्वाधिक असते. कल्याण ते एनआरसी कंपनीमार्गे टिटवाळा जाणाऱ्या मार्गामुळे मुख्य मार्गापासून वंचित भाग मुख्य रस्त्याला जोडला जाणार आहे. या भागात  मोठय़ा प्रमाणावर नागरिकीकरण होते आहे. टिटवाळा ते आग्रा महामार्ग जोडणारा जोड रस्त्याची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. हा मार्ग सुस्थितीत झाल्यास अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, उल्हासनगरहून आग्रा महामार्गाला जाणाऱ्या वाहनांना कल्याण दुर्गाडी, भिवंडीमार्गे किंवा सावदमार्गे जाण्याची  गरज पडणार नाही. सध्या या मार्गावरून मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होते आहे. दहिसर ते मुरबाड आणि  गायमुख ते पायेगाव या रस्त्यामुळेही राष्ट्रीय  महामार्गाना जोडणे शक्य होणार आहे. मुंबई, ठाणे आणि शहरांबाहेर पडण्यासाठी या मार्गाची वेळेत उभारणी होणे आवश्यक आहे.