ठाणे : कळवा येथील जुन्या पूलावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कळवा खाडी पूलावर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाची साकेतच्या दिशेकडील मार्गिका शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. ही मार्गिका सुरू झाल्याने साकेत मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टळणार असून जुन्या पूलावरील वाहतूकीचा भारही हलका होणार आहे.

ठाणे -बेलापूर मार्गावरील कळवा पूल हा अरुंद असल्याने दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने जुन्या पूलालगत नवा खाडी पूल निर्माण केला आहे. या पूलावरील सिडको येथून कळव्याच्या दिशेने जाणारी आणि कोर्टनाका येथून कळ्याच्या दिशेने वाहतूक करणारी पूलाची मार्गिका सुरू करण्यात आली होती. परंतु साकेत पूलाचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे पूल पूर्ण क्षमतेने सुरू नव्हता. साकेत मार्गिका सुरू नसल्याने साकेतहून कळव्याच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने जुन्या कळवा पूलावरूनच वाहतूक करत होते. त्यामुळे बाळकूम मार्गे येणाऱ्या वाहनांना कळवा येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते.

हेही वाचा >>> ठाणे : मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या संजय घाडीगावकरांविरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साकेत पूलाची मार्गिकाही सुरु करण्यात यावी अशी मागणी ठाणेकरांकडून सरू होती. अखेर शुक्रवारपासून ही मार्गिकाही सुरू झालेली आहे. त्यामुळे जुन्या कळवा पुलावरील वाहनांचा भार कमी होणार आहे. पूल पूर्णक्षमतेने सुरू झाल्याने ठाणे शहरातून कळवा, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक संपूर्णत: नवीन पुलावरुन करणे शक्य होईल. कळवा पुलाप्रमाणेच शहरातील सुरू असलेले इतर प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम हाती घेतले असून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी महापालिका, इतर शासकीय यंत्रणांमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले. नवीन कळवा पुलाची एकूण लांबी २.४० किलोमीटर असून पुलावरील मार्गिकांची सरासरी रुंदी ८.५० मीटर इतकी आहे. पुलाच्या सर्व मार्गिका वाहतुकीस उपलब्ध झाल्यामुळे आता पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला आहे.