पावसाने उघडीप देताच रेती माफिया सक्रिय

मुसळधार पावसामुळे ठाणे, डोंबिवलीच्या खाडीत गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला बेकायदा रेती उपसा पुन्हा एकदा जोमाने सुरू झाला असून जिल्हा प्रशासनाकडून होणारी कारवाईही तोकडी ठरू लागली आहे.  गेले महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळेही रेती उपशाचे प्रमाण घटले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रेती उपशाने जोर धरला असून जिल्हा प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कळवा, मुंब्रा, कल्याण शहरांच्या खाडी परिसरात काही दिवसांपासून रेती उपसा सुरू झाला आहे.

बांधकामाला लागणाऱ्या रेतीचा तुटवडा कमी होत असल्याचे कारण पुढे करीत कोकणपट्टीतील रेती उपशाला परवानगी देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. असे असले तरी मुंब्रा, कळवा, कल्याण शहरांच्या खाडी परिसरात बेकायदा रेती उपसा सुरूच आहे. पावसाळ्यात खाडी परिसरात बोटी जात नाहीत. परंतु पावसाने गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिल्याने पुन्हा एकदा खाडी परिसरात बेकायदा रेती उपसा करणाऱ्या बोटी दिसू लागल्या आहेत. पावसाच्या तोंडावर रेतीमाफियांनी खाडीकिनारी परिसरात दिवसरात्र रेती उपसा करण्याचा धडाकाच लावला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी स्वत: कारवाई करीत या रेतीमाफियांवर वचक निर्माण केला होता. त्यानंतर सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनीही ही कारवाई पुढे सुरूच ठेवल्याने उघडपणे होणारा हा उपसा छुप्या पद्धतीनेच माफियांना करत आहेत.  सहजासहजी कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून दिवसा खाडी परिसरात असलेल्या झुडपांच्या आडोशाला या बोटी उभ्या केल्या जातात.

दरम्यान, बेकायदा रेती उपशाविरोधात कारवाई सुरूअसून लवकरच  मोठी मोहीम हाती घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

प्रशासनाची कारवाई तोकडी

जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेतीमाफियांविरोधात जमीन महसूल व पर्यावरण कायद्यान्वये केवळ गुन्हा दाखल होतो. त्यांना अटक अथवा पुढील कारवाई काहीही होत नाही. रेती वाहतूक करणारे ट्रक जप्त केल्यास ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल होतो, परंतु मालकाविरोधात गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे  या माफियांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे चित्र आहे.