डोंबिवली – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन टेकड्यांवरील घनदाट जंगलाने वेढलेल्या प्रशस्त मैदानात पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असताना, अचानक दहशतवाद्यांनी या टेकड्यांवरील मैदानात पोलिसी वेशात मंगळवारी दुपारी प्रवेश केला. पुरुष, महिला, लहान मुलांंना दोन गटात विभागले. संबंधित पुरुष पर्यटक कोणत्या धर्माचा आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या अंगावरील कपडे उतरवून त्यांना नग्न करण्यात आले. तो पुरुष हिंदू आहे याची खात्री पटल्यावर त्यांच्या सर्वांगावर, कुणाच्या डोक्यात गोळ्या घालून दहशतवाद्यांनी त्या पुरुष पर्यटकांना आपल्या कुटुंबीयांच्या समोर ठार मारले.
आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याला आपल्या समोर दहशतवाद्यांकडून ठार मारले जात असताना, आपण आर्त किंकाळ्या, जागीच तडफड, हताशपणे पाहण्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही या विचाराने कुटुंबीयांची घालमेल झाली होती. अशाच एका पर्यटकामध्ये डोंबिवली पश्चिमेत नवापाडा भागात सुभाषचंद्र रस्ता भागात कोल्हापुरे चौकातील इमारतीत संजय लेले यांच्या कुटुंबीयाचा समावेश होता. लेले यांच्या पत्नीला पार्किनन्सचा त्रास आहे. त्यांना मोकळ्या वातावरणाचा आनंद घेता यावा. मुलाच्या शाळेला सुट्टी लागली आहे. त्यामुळे आपल्याकडील भाजून टाकणारा कडक उन्हाळा म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जाऊ असा विचार करून लेले कुटुंबीयांनी आपल्या खास मित्रांसह जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

लेले यांनी पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक भागात राहणारे आपले मित्र अतुल मोने, भागशाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी यांच्यासह काश्मीरला पहलगाम येथे जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसापूर्वी ते तेथे पोहचले. मोने हे नोकरी आणि भिक्षुकी करत होते. पहलगाम येथे जाणारे बहुतांशी पर्यटक नंदनवनाचा आस्वाद घेण्यासाठी बैसरन टेकड्या भागात आवर्जून जातात. येथे जाण्यासाठी घोडे, खेचरांचा वापर केला जातो. घनदाट जंगलाने वेढलेल्या टेकड्यांवर सुमारे ४० ते ५० एकरचे प्रशस्त मैदान आहे. याठिकाणी मौजमजा, खानपान सेवेची सोय आहे. संजय लेले स्वता, पत्नी, मुलगा, हेमंत जोशी आणि अतुल मोने या टेकड्यांवर मंगळवारी पर्यटनाचा आनंद घेत होते. दुपारच्या वेळेत अचानक पोलिसी वेशात बैसरन टेकड्यांवरील मैदानात दहशतवादी आले. त्यांनी मैदानाच्या एका भागात घनदाट जंगलाला लागून असलेल्या खानपान सेवेच्या ठिकाणी येऊन पर्यटकांना वेठीस धरले.

प्रभावी शस्त्रांचा वापर आणि धाक दाखवित त्यांनी पुरुष पर्यटकांना वेचून एका बाजुला केले. या पुरुषांबरोबरील महिला, बालके यांना एका बाजुला होण्यास सांगितले. हे पुरुष कोणत्या धर्माचे आहेत हे पाहण्यासाठी पुरुषांच्या अंगावरील सर्व कपडे काढुन टाकण्यास सांगण्यात आले. ते नग्न झाल्यानंतर ते कोणत्या धर्माचे आहेत याच खात्री पटल्यावर दहशतवाद्यांनी एकेक करून त्यांच्या कुटुंबीयांच्या समोर पुरुष पर्यटकांना गोळ्या झाडून ठार मारले.

संजय लेले यांना दहशतवाद्यांनी कुटुंबीयांपासून खेचून नेले जात असताना कुटुंबीयांनी बचाव, किंकाळ्या फोडाल्या. हा जीव वाचवाचा कुटुंबीयांचा टाहो सुरू असताना दहशतवादी आपल्या बाबांना, पतीला काय करतात यासाठी कुटुंबीयांचा जीव कोंडलेला असतानाच दहशतवाद्यांनी संजय लेले यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. आपले वडील, काका, मामा यांचे मृतदेह सावरण्याची वेळ २० वर्षाच्या संजय लेले यांच्या मुलावर आली. या घटनेने हवालदिल झालेल्या आपल्या आईला सावरत हर्षल लेले हा मुलगा बैसरीन टेकडी ते रुग्णालय धावाधाव करत होता. डोंबिवली शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.