लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: अगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षात मोठे फेरबदल केले असून यामध्ये ठाणे महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते दुसऱ्यांदा पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत.
ठाणे शहरातील नौपाडा परिसराचे संजय वाघुले हे प्रतिनिधित्व करतात. या भागातून ते गेली २० वर्षे नगरसेवक म्हणून निवडूण येत आहेत. ठाणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष, पक्षाचे गटनेते, आरोग्य समिती सभापती यासह नौपाडा प्रभाग समिती सभापती अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. त्यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा… VIDEO: ठाणे महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटना टळली; विद्युत मीटर खोलीला लागलेली आग तात्काळ विझवली
ओबीसी असलेले संजय वाघुले माळी समाजाचे आहेत. माजी जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे, ॲड संदीप लेले आणि संजय वाघुले या तिघांची नावे ठाणे जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती. यापैकी कुणाच्या गळ्यात माळ पडणार हे याविषयी उत्स्कूता होती. या पदावर नियुक्ती करण्यापुर्वी भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील पदाधिकारी आणि भाजपा संबंधित घटकांशी चर्चा केली होती. त्यानंतर वाघुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूका पुढील वर्षी होणार आहेत. त्याचबरोबर महापालिका निवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकीत वाघुले यांची कसोटी लागणार आहे.
हेही वाचा… कल्याण ग्रामीण भागाला पुराचा फटका, रायते पुलावर पाणी आल्याने कल्याण-नगर रस्ता बंद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत. त्यात आता अजित पवार हे सत्तेत सामील झाले आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुती असल्याने उमेदवार निवड, तिकीट वाटपाचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.