|| भाग्यश्री प्रधान

विनामूल्य बससेवा योजनेचा बोजवारा; मुरबाड, शहापूरमध्ये अवघ्या चार गाडय़ा

ग्रामीण भागातील मुलींची पटसंख्या वाढवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेली गाव ते शाळा या विनामूल्य एसटी बससेवेचा ठाणे जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील आदिवासीबहुल गावपाडय़ांमध्ये ही सेवा देण्यात आली आहे. मात्र, दिवसभरात या दोन्ही भागांत अवघ्या चार बसगाडय़ा सोडण्यात येत असून अनेक गावांत या बस जातच नसल्याचे समोर आले आहे.

ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी मानव विकास योजनेतंर्गत घर ते शाळा आणि शाळा ते घर अशा एस.टी. गाडय़ा सोडण्यात येतात. या योजनेतून मुरबाड आणि शहापूर तालुक्यात प्रत्येकी सात गाडय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुरबाड येथे सात बस गाडय़ा ८४ फेऱ्या मारतात तर शहापूर येथे नियोजित केलेल्या सात बसगाडय़ा एकूण ६८ फेऱ्या मारत असल्याची माहिती एसटी विभागातर्फे देण्यात आली.  फक्त सात गाडय़ा दिवसांतून ६८ किंवा ८४ फेऱ्या मारू शकतात का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सकाळी ७, दुपारी १२.३०, सायंकाळी ४.३० या वेळेत या बस गाडय़ा सोडल्या जात आहेत. एकूण शहापूर येथे दिवसाला १,५४७ विद्यार्थिनी प्रवास करतात तर मुरबाड येथून दिवसाला १,२०७ विद्यार्थिनी प्रवास करीत असल्याचे एस.टी. विभागातर्फे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मात्र मुरबाडमधील ८८२ विद्यार्थिनी आणि शहापूरमधील ८२५ विद्यार्थिनी या योजनेतून प्रवास करीत असल्याची माहिती दिली आहे. सुरुवातीच्या काळात दोन्ही तालुक्यात सात गाडय़ा सुरू होत्या. मात्र सध्या जेमतेम चार गाडय़ा सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गावांमध्ये ही बससेवा उपलब्ध नसल्याचे संबंधित गावातील रहिवाशांनी सांगितले.

शहापूर येथे जिल्हा परिषदेच्या एकूण ४६५ प्राथमिक शाळा आहेत तर १५० ते २०० माध्यामिक शाळा आहेत. मानव विकास योजनेला प्रारंभ झाल्यानंतर या गाडय़ा नियमित येत होत्या. मात्र सहा महिन्यानंतर चारच गाडय़ा सोडल्या जात असून अनेक भागांत या गाडय़ा पोहचतच नसल्याची तक्रार विद्यार्थिनी करीत आहेत. त्यामुळे गावातून शाळेत जाण्यासाठी सात ते आठ किलोमीटर अंतर पायी कापावे लागते. त्यातच शहापूर आणि मुरबाड येथे अधिक पाऊस पडतो. अशा वेळी येथे ओढे, नाले रस्त्यातून वाहतात. त्यामुळे शाळेत जाणे विद्यार्थिनींना जिकरीचे होत असल्याची माहिती येथील शाळेच्या विद्यार्थिनींनी दिली.

जिल्हा परिषद प्रशासन एका एस.टी. गाडीचे प्रति महिना साठ हजार रुपये देते. सध्या दोन्ही तालुक्यात फक्त आठ गाडय़ा सुरू आहेत. मग उर्वरित सहा गाडय़ांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडे याबाबत वारंवार विचारणा करूनही या संदर्भात प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

एस.टी. महामंडळाकडे विद्यार्थिनींचे पास आहेत. त्यावरून ही आकडेवारी काढली जाते. गावे ते शाळा हे अंतर कमी असल्याने फक्त सात बस असल्या तरी अधिक फेऱ्यांचे नियोजन करता येते. त्यामुळे दिलेली आकडेवारी योग्य आहे.   – आर. एच. बांदल, विभाग नियंत्रण अधिकारी.