स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण; विविध कामांसाठी निधीही मिळाला

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक सोयी सुविधांपासून वंचित असतात. सुविधांसाठी झगडणाऱ्या तेथील विद्यर्थ्यांना आधुनिक ई-लर्निगचे शिक्षण दूरचीच गोष्ट. परंतु पालघर जिल्ह्यतील सागाव गावातील एका शाळा शिक्षकाने विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले आणि मदतीच्या ओघ सुरू झाला. आता या शाळेचे रूप पालटले असून विद्यर्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळू लागले आहे.

आदिवासीबहूल पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचीही बिकट अवस्था. आधुनिक सुविधा तर दूरची गोष्ट पण अगदी शद्ध पाण्याचीही सोय नसते. अनेकदा वीज भरणा न केल्याने शाळांचा वीजपुरवठा खंडित झालेला असतो. शाळेतील शिक्षक सातत्याने प्रशासनाकडे विविध प्रस्ताव पाठवून मागण्या करत असतात. परंतु शासकीय अनास्थेमुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात. यामुळे सागावे गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने प्रशासनावर अवलंबून न राहता शाळेच्या विकासासाठी शैक्षणिक उठाव करण्याचा निर्णय घेतला. शाळेला मदत करू शकतील, अशा स्वयंसेवी संस्थांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट या संस्थेने सकारात्कम प्रतिसाद दर्शवला. या मदतीचा पाठपुरावा करण्यासाठी पालघरहून सुभाष सोंडे सातत्याने मुंबईला येत असत. वर्षभर केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आणि शाळेच्या विविध कामांसाठी निधी मिळाला.

त्याच्या प्रयत्नानंत शाळेमध्ये ई-लर्निगंची सोय, शुद्ध पाणी देणारे यंत्र, संरक्षक भिंत, फाटक मिळाले. शालापयोगी साहित्य मिळाले आणि शाळेची डागडुजी झाली. विद्यर्थ्यांना शौचालय नव्हते, ते बांधून देण्यात आले आणि शाळेत पहिल्यांदा छोटेखानी ग्रंथालय सुरू करण्यात आले. शाळेत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा’ बसवण्यात आली आणि रंगरंगोटी करून शाळेला नवीन रूप देण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट या संस्थने शाळेसाठी पाच लाख रुपयांचा खर्चही केला.

बदली झाली, तरी निर्धार कायम

संस्थेच्या मदतीमुळे शाळेचे पालटलेले रुपडे पाहून मुलांना अनोखा आनंद झाला आहे. परंतु शाळेचे रुप पालटले, सुविधा आल्या पण सोंडे यांची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली आहे. सोंडे गावराई शाळेत रुजू झाले आहेत. परंतु या शाळेतदेखील अशीच अवस्था असल्याने या शाळेतदेखील अशाच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली. त्यांचे योगदान मोठे आहे. मी काही फार विशेष केलं नाही. हे संस्थेने केलेली मदत आहे. मी केवळ पाठपुरावा केला इतकाच.

सुभाष सोंडे, शिक्षक.