ठाणे : भिवंडी येथे एका शाळेच्या विद्यार्थीनीचा रिक्षा चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने अपहरणाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थीनीने दप्तरातील कर्कटकचा वापर करुन रिक्षा चालकावर हल्ला केला. त्यानंतर रिक्षातून बाहेर उडी मारत स्वत:चा जीव वाचविला. विद्यार्थ्यींनीने या घटनेची माहिती तिच्या पालकांना दिल्यानंतर याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडी येथील शांतीनगर भागात १६ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. ती भिवंडी येथील एका शाळेत इयत्ता १० वीचे शिक्षण घेत आहे. ९ जुलैला ती दुपारी १२ वाजताच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी निघाली होती. घराजवळून तीने रिक्षातून प्रवास सुरु केला. त्यावेळी ती रिक्षामध्ये ती एकटीच प्रवास करत होती. रिक्षा काही अंतर पुढे गेल्यानंतर आणखी एक प्रवासी रिक्षामध्ये बसला. शाळेजवळ रिक्षा पोहचल्यानंतर तिने चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितली. परंतु त्या चालकाने रिक्षा थांबविली नाही. त्यानंतर रिक्षामधील प्रवाशाने तिला गप्प बसण्यास सांगितले.
रिक्षा चालक चाविंद्र येथे रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी समय सूचकता दाखवित विद्यार्थीनीने दप्तरातील कर्कटक बाहेर काढून रिक्षा चालकावर हल्ला केला. त्यानंतर शेजारी बसलेल्या प्रवाशास धक्का मारून रिक्षातून उडी मारत पळ काढला. ती शाळेत पोहचली. शाळेतून घरी आल्यानंतर तिने याबाबतची माहिती तिच्या आई आणि वडिलांना सांगितली.
११ जुलैला या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित रिक्षा चालक आणि त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला आहे. घटनेबाबतची माहिती भिवंडीत पसरल्यानंतर पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित रिक्षा चालक आणि त्याच्या साथिदारावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ चे कलम १३७ (२) आणि ६२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.