Marathi nameplate news : ठाणे : शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध होऊन तो मागे घेतल्यानंतर मराठीच्या वापराबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसने तक्रार केल्यानंतर ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांना ‘शाळांचे नामफलक मराठीत लावणे अनिवार्य’ असल्याचे आदेश दिले असून, नियम न पाळल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.
राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयावर टीका केली होती. यानंतर सरकारने अखेर हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता. असे असले तरी या निमित्ताने झालेल्या आंदोलनानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा सातत्याने पुढे येत असून ठाण्यातील काँग्रेस पक्षानेही मराठीचा मुद्दा उपस्थित केला होता.
काँग्रेस तक्रारीची दखलमहाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आपल्या नामफलकांवर मराठी भाषेचा अनिवार्य वापर करण्याचे आदेश महापालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिले आहेत. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी हा निर्णय घेतला असून तसे परिपत्रकाद्वारे जाहीर केले. हा निर्णय १४ मार्च २०२४ रोजीच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे.
शाळांचे नामफलक मराठीत लावा अन्यथा..
महापालिका हद्दीतील सर्व मनपा, अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले नामफलक तात्काळ मराठीत लावावेत. त्याचबरोबर शाळांनी सर्व पत्रव्यवहारही मराठी भाषेतच करावा, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिले आहेत. आदेशाच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई झाल्यास संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आठ दिवसांच्या आत अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात आले असून, या परिपत्रकाची प्रत शिक्षण विभागाने माहितीस्तव ठाणे महापालिकेचे उप आयुक्त (शिक्षण) व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना पाठविली आहे.