ठाणे : मागील काही महिन्यापासून ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने भर उन्हाळ्यात छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. स्थानकातील पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटांवर ही कामे सुरू आहेत. या कामांसाठी वापरल्या जाणारे साहित्य तसेच भंगार साहित्यांचा ढीग या फलाटावर पडलेला आहे. या फलाटावर थांबणाऱ्या गाड्या आणि प्रवाशांची संख्या पाहता हे साहित्य प्रवाशांना अडथळा आणणारे ठरत आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

ठाणे स्थानकात प्रचंड वर्दळ असते. या स्थानकातून रोज पाच ते सहा लाख प्रवासी ये – जा करतात. यात ठाणे पलीकडील परिसरातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तसेच ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत. त्यामुळे विविध शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात ये-जा करतात. यामध्ये रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहा वरून प्रवाशांच्या वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. या फलाटावरून मुंबईहून कसारा, कर्जत, कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्या थांबतात. येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात. त्यामुळे स्थानकातील इतर फलाटांच्या तुलनेत या फलाटावरुन प्रवाशांची संख्या अधिक असते. अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते.

त्यातच मार्च महिन्यापासून या फलाटावर विविध कामे सुरू आहेत. भर उन्हाळ्यात रेल्वे प्रशासनाने छत दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्य त्याचप्रमाणे भंगार साहित्यांचा येथे ढीग पडलेला आहे. यामध्ये बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्याजवळ लोखंडी पत्रे, लोखंडी सळ्या, लोखंडी खांब ठेवण्यात आले आहेत. येथे ही साधने अस्ताव्यस्त पद्धतीने ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर मध्यभागी अवजड लोखंडी साहित्यांचा ढीग लावलेला आहे. या ढीगामुळे प्रवाशांना फलाटावर चालण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक राहिली नसल्याने रेल्वेचा धक्का लागून अपघात होण्याची भीती आहे. या फलाटावर थांबणाऱ्या गाड्या आणि प्रवाशांची संख्या पाहता हे साहित्य प्रवाशांना अडथळा आणणारे ठरत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबत असल्यामुळे बाहेरगावी जाणा-येणाऱ्या प्रवाशांमध्ये ज्येष्ठ आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यांनाही या फलाटावर वावरणे कठीण झाले आहे. त्यात सकाळी आणि सायंकाळी या ठिकाणी प्रवाशांची सर्वाधिक गर्दी होत असते. त्यांनाही अपघाताचा सामना करावा लागू शकतो.

पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटावरील काही भागातील छताच्या दुरुस्तीची कामे ही शिल्लक आहेत. थोड्या दिवसात ही कामे पुर्ण होतील. कामे पुर्ण होताच या ठिकाणावरील साहित्य काढण्यात येईल.केशव तावडे, स्टेशन मास्तर

प्रतिक्रीया

या ठिकाणी भंगार साहित्यांचा ढीग असल्यामुळे फलाटावर उभे राहण्यासाठी जागा राहत नाही. त्याचप्रमाणे रेल्वेगाडीच्या दरवाजा समोरचा हा ढीग येतो. गर्दीच्यावेळी गाडीमध्ये चढ – उतरत करताना एखाद्याचा धक्का लागल्यास अपघात होण्याची शक्यात आहे. आरोही शिंदे, प्रवासी