लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झाल्याने देशभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. राम भक्त आपल्या परीने या आनंदात सहभागी झाले आहेत. कल्याण पश्चिमेतील कुंभारवाडा येथील मित्र मंडळाचे मूर्तिकार, मनोवी, रायसी रामजी राठोड ग्रुपच्या कलाकारांनी एकत्र येऊन कुंभारवाडा येथे राम भक्तांच्या समक्ष सहा फूट उंचीच्या राम मूर्तीची उभारणी केली आहे. तीन तासाच्या अवधीत या मूर्तीची बांधणी करण्यात आली. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी कल्याण परिसरातून भाविकांनी रांगा लावल्या आहेत.

आपल्या समक्ष साक्षात प्रभू रामाची मूर्ती साकारल्याने भाविकांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले आहे. राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर आपण आगळेवेगळे करून दाखवावे या उद्देशाने सहा फूट उंचीची प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची उभारणी करण्याचा निर्णय कुंभारवाड्यातील मूर्तिकार सदस्यांनी घेतला.

आणखी वाचा-दिवंगत आनंद दिघे यांच्या आश्रमातील लॉकर सीबीआयच्या पथकाने उघडले आणि…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोवी ग्रुपचे चेतन ठक्कर, विमल ठक्कर, तनय कारिया, कुंभारवाडा मित्र मंडळाचे सदस्य, रायसी रामजी राठोड यांनी रविवारी संध्याकाळी प्रभू रामचंद्राची सहा फूट उंचीची मूर्ती तयार करण्यास प्रारंभ केला. या कामासाठी पर्यावरण संवर्धनाचा विचार करून शाडूच्या मातीचा वापर करण्यात आला. तीन ते चार तासाच्या अवधीत भव्य देखणी आकर्षक प्रभू रामाची मूर्ती मूर्तिकार किरण तूपगावकर, समीर येळेकर यांनी साकारली. प्रभू रामचंद्रांच्या गाण्याची धून लावून याठिकाणचे वातावरण प्रसन्न करण्यात आले आहे. नियोजन करून भाविकांना येथे दर्शन घेऊन दिले जात आहे.