ठाणे : घोडबंदर येथील सूरज वॉटर पार्कच्या आवारात मगर आढळल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. रॉ संस्था आणि वनविभागाने या मगरीची सुखरूप सुटका केली असून त्या मगरीला पुन्हा जंगलात सोडण्यात आले आहे.

सूरज वॉटर पार्कच्या आवारात कर्मचाऱ्यांना गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मगर दिसून आली. या घटनेची माहिती व्यवस्थापकांनी रॉ संस्थेला आणि वनविभागाला दिली. त्याआधारे, रॉ संस्थेचे स्वयंसेवक, ठाणे वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या मगरीची सुखरूप सुटका केली. ही मगर सात फूट लांब असून परिसरातील जंगलातून ती आली असावी, असा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रुग्णालयात या मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मगरीला जंगलात सोडण्यात आले.