डोंबिवली पश्चिम येथील उमेशनगर भागातील रस्त्यावर एका वाहन चालकाने मद्यपान करून भरधाव वेगाने वाहन चालवल्याने सातवाहनांचा चुराडा झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी मद्यपी वाहन चालकाला पकडून विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी नुकसान झालेल्या वाहनचालकांच्या तक्रारीवरून मद्यपी वाहनचालक निळकंठ पटवर्धन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, निळकंठ मनोहर पटवर्धन (रा. साई सिद्धी सोसायटी, उमेशनगर, डोंबिवली पश्चिम ) हा मद्यपान करून उमेशनगर मधील अरुंद रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन घेऊन चालला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली दुचाकी, मोटार, रिक्षा वाहने यांच्या मधून वाट काढत पुढे जाणे निळकंठ यांना जमले नाही. भरधाव वेगात असल्याने त्यांचा मद्याच्या नशेमध्ये वाहनावरील ताबा सुटला. त्याचे वाहन जोराने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला आदळले. पण वाहनाचा वेग अधिक असल्याने त्याच्या वाहनाने दुचाकीसह रांगेत उभ्या असलेल्या इतर विचारलं ५ दुचाकी दोन रिक्षा यांना जोरदार ठोकर देऊन त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महावितरणच्या डीपीला जाऊन धडकले.

या अपघातामुळे पादचारी पळाले आणि वाहनांच्या धडकेच्या मोठ्या आवाजामुळे रहिवासी घराबाहेर आले. तेव्हा त्यांना एका वाहनाने इतर वाहनांना जोराची धडक दिली असल्याचे समजले.मद्यपी वाहनचालक पटवर्धन यांना नागरिकांनी पकडले. तो मद्यधुंद असल्याने नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकला नाही. नागरिकांनी आणि वाहनाचे नुकसान झालेल्या वाहन मालकांनी मद्यपी वाहनचालक निळकंठ पटवर्धन यांना पकडून विष्णुनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

उमेश नगर मधील रिक्षाचालक मंगेश कदम यांच्या चुराडा वाहनाच्या धडकेत झाला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नीळकंठ पटवर्धन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.