कल्याण – शहापूर एस. टी. बस आगारातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बहुतांशी बसचे दर्शनी भागातील गावांचे शेवटचा थांबा (गन्तव्य स्थान) दर्शविणारे नामफलक खराब, पुसट आणि जुने झाले होते. त्यामुळे प्रवाशांना दर्शनी भागात बस कोठे जाणार आहे असा मार्गफलक दिसत असला तरी त्यावरील पुसट नावाने प्रवाशांचा गोंधळ होत होता.
हा गोंधळ शहापूर तालुक्यातील चांग्याचापाडा येथील सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी दूर केला. आणि दिवाळीनिमित्त शहापूर एस. टी. बस आगारातून विविध गावांमध्ये, परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचे गन्तव्यस्थानाचे १५० हून अधिक मार्गफलक बनवून दिले.
या आगळ्या वेगळ्याचे उपक्रमाचे प्रवाशांबरोबर एस. टी. बस आगारातील अधिकारी, वाहक, चालक यांनीही समाधान व्यक्त केले. शहापूर बस आगार उभारून ५० वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. नवीन बस आगार उभारणीची कामे जोमाने सुरू आहेत. बस आगारातील बस गाड्या जून्या झालेल्या आहेत. या बसआगारा बरोबर या बसवर दर्शनी भागात झळकणारे यापूर्वीचे तीन फूट लांबीचे काळ्या रंगाने रंगविलेले आणि त्यावर पांढऱ्या शुभ्र रंगाने ठळकपणे गावांची नावे लिहिलेले फलक गंजले आहेत. त्यावरील नावे पुसली गेली आहेत.
यापूर्वी बसच्या दर्शनी भागातील चालकाच्या समोरील वरील भागात बस कोठे जाणार आहे असा फलक झळकत असे. आता बसचा चेहरा बदलल्याने चालकाच्या डाव्या बाजुला कोपऱ्यात हे नामफलक अडकविलेले असतात. शहापूर बस आगारात अशाप्रकारचे नाम फलक आहेत. त्यावरील रंग उन-पावसाने उडाला आहे. त्यामुळे बसच्या दर्शनी भागात चालकाच्या बाजुला नामफलक झळकत असला तरी फलकावरील गावाचे नाव दूरवरून ठळक दिसत नसल्याने प्रवाशांची अडचण होत होती.
ही अडचण शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसतील चांग्याचापाडा येथील सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी ओळखली. त्यांनी बस आगारातील अधिकाऱ्यांनी संपर्क साधून प्रत्येक बसच्या दर्शनी भागात सुस्पष्ट दिसेल असा गावांच्या नावाचा दर्शनी फलक देण्याचा प्रस्ताव ठेवला. अधिकाऱ्यांनी तो मान्य केला.
दिवाळीनिमित्त शहापूर एस. टी. बस आगारातून बस कोठुन कोठे धावणार आहे असे १५० हून अधिक नामफलक तयार करून घेतले. हे नामफलक एक फुटाच्या लोखंडी पट्टीवर लालभडक अक्षरात गावांच्या नावाने रंगविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता दूरवरून समोरून येणारी बस कोठे जाणार आहे दिसू लागले आहे. आता प्रवाशांची बस कोठे जाणार आहे असे विचारण्याची अडचण दूर झाली आहे.
शहापूर एस. टी. बस आगारातून सुटणाऱ्या बहुतांशी बस समोरील गावांचे नाव असलेला, बस कोठुन कोठे जाणार आहे असे नामफलक उनपावसामुळे पुसट झाले होते. प्रवाशांना बस समोर नामफलक असुनही तो स्पष्ट दिसत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे आपण दिवाळीनिमित्त दीडशेहून अधिक गावांच्या नामफलकांची भेट शहापूर एस. टी. आगाराला दिली. – बबन हरणे, सामाजिक कार्यकर्ते, चांग्याचापाडा.
बसच्या समोरील फलक पुसट असल्याने ज्येष्ठ, वृध्द यांना बस चालक, वाहक यांना बस कोठे जाणार हे विचारावे लागत होते. या नवीन नामफलकामुळे ही प्रवाशांची अडचण दूर झाली आहे. – नारायण मडके, प्रवासी, शिरगाव.
