शहापूर : गेल्या आठ वर्षांपासून शहापूर- मुरबाड रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः दुर्दशा झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनादिवशी खड्ड्यात बसून आंदोलन केले. तासभर सुरु असलेल्या या आंदोलनामुळे मुरबाड, किन्हवली, डोळखांब येथील रस्ते वाहतुक ठप्प झाली होती. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी येत्या गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शहापूर–मुरबाड–पाटगाव–खोपोली राष्ट्रीय महामार्गाचे आठ वर्षांपासून काम सुरु आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ४ऑगस्टला याच मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी १० दिवसांत डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. आश्वासनानंतरही दुरुस्ती होत नसल्याने स्थानिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी खड्ड्यात बसून आंदोलन केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विशेष म्हणजे या आंदोलनात नागरिकांसह सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. तब्बल तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मुरबाड, किन्हवली, डोळखांब येथून येणारी व जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तेथे पोहचले. गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवून पावसाळ्यानंतर डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर स्थानिकांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.