नाशिकच्या भावली धरणातून पाणी

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील शहापूरमध्ये असणाऱ्या दुर्गम भागातील ९७ आदीवासी गावे आणि २५९ पाडय़ांना आता नाशिक जिल्ह्य़ातील भावली धरणाचे पाणी मिळणार आहे. धरणातून मिळणारे हे पाणी ग्रिड पद्धतीने दिले जाणार असून पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकारी समितीच्या बैठकीत या योजनेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील दुर्गम भागांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यात बहुतांश भागात भाग हा डोंगराळ असून या भागातील नागरिक हे पारंपरिक  पाण्याच्या स्रोतावर अवलंबून आहेत. मात्र, उन्हाळ्यात पारंपरिक पाण्याचे स्रोत कोरडे पडतात. त्यामुळे या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती समितीची मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नाशिक जिल्ह्य़ातील भावली धरणाचे पाणी शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ पाडय़ांना देण्याच्या योजनेसाठी आवश्यक असलेल्या खर्चाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.

या बैठकीसाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभय महाजन, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

काय आहे ग्रिड पद्धत

डोंगराळ भागात असलेल्या गावांमध्ये अनेकदा पाणी टंचाईची समस्या असते. या वेळी ग्रिड पद्धतीचा वापर करण्यात येतो. या पद्धतीमध्ये डोंगराळ भागात सर्वात उंचावर असणाऱ्या धरणामधून या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. भावली धरण हे उंचावर असल्याने त्याचे पाणी या गावांमध्ये ग्रिड पद्धतीने सोडण्यात येणार आहे.