राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे सोमवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते दिवसभर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्ताबदल झाला असून या सर्वाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर शरद पवार येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – ठाणे : गणेशोत्सवानिमित्त बाजारात नागरिकांची खरेदीला गर्दी

शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यानंतर झालेला सत्ताबदलाचा केंद्रबिंदू ठाणे जिल्हा ठरला आहे. शिवसेनेत मोठी फूट पडलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळत आहे. दहीहंडी उत्सवाच्यनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जिल्ह्यात दौरे केले होते. येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे आज, सोमवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. संपुर्ण दिवसभराच्या दौऱ्यात ते जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे दोन्ही नेते दौऱ्याचे नियोजन आखत आहेत. पवार यांचा अचानकपणे हा दौरा होणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.