लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भिवंडीमध्ये अवैध अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असून गुन्हेगारी वाढली आहे असल्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी ही भेट घेतल्याचे बाळ्या मामा यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच बाळ्या मामा यांनी लोकसभेत भिवंडीतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती शांत राहावी यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यांच्या भाषणानंतर १४ गुन्हे दाखल असलेल्या सुजीत पाटील उर्फ तात्या याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्या मामा आहेत. त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव करून भाजपला आणि कपिल पाटील यांना धक्का दिला होता. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारी व अमली पदार्थ माफियांबाबत म्हात्रे यांनी संसदेत भाषण केले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने भिवंडी शहरात मोठी कारवाई करून ८०० कोटी रुपये किमतीचा ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रगचा साठा जप्त करून दोघा जणांना अटक केली आहे. मात्र या दोन आरोपींपर्यंतच ही कारवाई थांबली असून या दोघा आरोपींच्या मागे सूत्रधार कोण आहेत याचा तपास करावा. गुजरात एटीएसच्या कारवाई नंतरही शहरात अमली पदार्थांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरूच असून शहरातील तस्कर आणि त्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार बाळ्या मामा यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमली पदार्थ तस्कर आणि गुन्हेगार न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतरही हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी, दरोडे, धमकी, खंडणी, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाविणे असे गंभीर गुन्हे करत असून या गुंडांच्या मागे असलेल्या राजकीय शक्तीमुळे पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांना अटक करताना मोठी अडचण असल्याचे सांगत बाळ्या मामा यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यावर कारवाई करावी यासंदर्भातील लेखी निवेदन देखील म्हात्रे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याकडे दिले आहे. आपल्या मागणीकडे विशेष लक्ष दिले असून लवकरात लवकर या संदर्भात पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात येतील असे आश्वासन अमित शहा यांनी आपल्याला दिले आहे अशी प्रतिक्रिया बाळ्या मामा यांनी दिली आहे.