ठाणे – शिवसेना ( शिंदे गट) स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून या यादीत पक्षाचे उपनेता शरद पोंक्षे यांचा समावेश आहे. असे असतानाही शरद पोंक्षे यांनी सोमवारी ठाण्यातील मनसेच्या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित राहून उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) यांची महायुती आहे. या पक्षाचे नेते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे आवाहन पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करीत आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदार संघात महायुतीतर्फे भाजपचे आमदार संजय केळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात मनसेने अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. जाधव यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी घोडबंदर येथील ब्रह्मांड नाका परिसरात जाहीर सभा घेतली. या सभेच्या व्यासपीठावर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेता आणि स्टार प्रचारक शरद पोंक्षे हे उपस्थित होते. इतकच नव्हे तर त्यांनी या व्यासपीठावरून भाषणही केले. मी जरी शिवसेना (शिंदे गट) उपनेता असलो तरी, मी माझे निर्णय घेऊ शकतो. कोणालाही पक्षात घेण्याचा निर्णय जर ते घेऊ शकतात. तर, मी देखील या व्यासपीठावर का येऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला फक्त महाराष्ट्र चांगला झालेला पाहायचा आहे. राज ठाकरे आणि  त्यांचे शिल्लेदार आजारी झालेल्या महाराष्ट्राला बरे करण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे या विधानसभेत महाराष्ट्राला बरे करण्यासाठी डॉक्टर पाठवायचे असून यासाठी जास्तीत जास्त मनसेची लोक दिसावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. सर्वांना माझी विनंती आहे की, जास्तीत जास्त हे इंजिन कसे धावेल या इंजिनामागे एकएक डब्बे कसे लागतील याचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्राची ही गाडी अशी सुसाट धावली पाहिजे की, त्या खऱ्या बुलेट ट्रेनची गरजच भासता कामा नये असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.सर्व महापुरुषांकडे मी प्रतिज्ञा करतो की, राज ठाकरेंना बळ द्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला इंजिनच्या चिन्हावर शिक्का मारण्याची बुद्धी द्या, असे वक्तव्य त्यांनी केले. ठाणे शहर मतदार संघात महायुतीचे उमेदवार संजय केळकर हे निवडणुकीच्या रिंगणात असतानाही, त्यांच्या विरोधी उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन शिंदेच्या शिवसेनेचे स्टार प्रचारक पोंक्षे यांनी केल्याने महायुतीच्या नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.