ठाणे – संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. परंतू, इतक्या वर्षानंतरही आरोपी सिद्ध करताना काही त्रुटी राहिल्या आणि पुराव्यांअभावी आरोपींची निर्देषमुक्तता करण्यात आली. त्यामुळे मालेगाव बॉम्ब स्फोटचा निकाल देण्यात सरकारला अपयश आले असल्याचा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर लगावला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल १७ वर्षांनी लागला. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. हा निकाल लागताच विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्यास सरकारला यश आले आहे. परंतू, बॉम्बस्फोट नक्की कोणी केला हे सिद्ध करताना त्यात काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असा टोला शशिकांत शिंदे यांनी सरकारवर लगावला. २६/११ च्या हल्ल्यातील देखील सगळे आरोपी सुटले आहेत. त्यात, आता मालेगाव बॉम्ब स्फोटमधील आरोपी सुटलेले आहेत. त्यामुळे आमचे म्हणणे एकच आहे की, आपण कुठे कमी पडलो आहोत, आपल्या पुराव्यांमध्ये काय त्रुटी राहतायंत याचा निश्चितपणे अभ्यास करुन राज्यसरकारने सर्वेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, दहशतवाद्याला कुठल्याही प्रकारचा रंग नसतो. त्यांची मानसिकता काय आहे हे महत्त्वाचे आहे. आज देशात जी अस्थिरता आहे. ही अस्थिरता बघितल्यानंतर दुर्देव येवढेच वाटते की, या देशात असे निकाल लागत गेले तर, कोणी कोणताही गुन्हा करु शकतो, अशी खंत शिंदे यांनी मांडली. आपण कायद्याच्या चौकटीतून सुटू शकतो असा भ्रम त्या गुन्हेगारांमध्ये निर्माण होईल, त्यांना कायद्याची भितीच राहणार नाही. त्यामुळे भगवा दहशतवाद किंवा हिरवा दहशतवाद याला महत्त्वच नाही. देशावर ज्यांनी हल्ला केला, देशाच्या कायदा सुव्यवस्थेला ज्यांनी आव्हान दिले, अशा गुन्हेगारांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.