जलवाहिनी फुटल्याने शिळफाटा रस्ता जलमय

शेकडो लिटर पाणी वाया; वाहतुकीलाही फटका

शेकडो लिटर पाणी वाया; वाहतुकीलाही फटका

डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील देसई गावाजवळ बुधवारी सकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची १८०० मीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. शेकडो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने परिसर जलमय झाला होता. सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या नोकरदारांना रस्त्यावरील पाण्याचा फटका बसला. रस्त्यावरील पाण्यातून संथगतीने वाहने चालवावी लागत असल्याने काही वेळ या भागात वाहतूक कोंडी झाली होती.

गेल्या दीड वर्षांत काटई ते खिडकाळी, देसई गाव हद्दीत एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याची ही सहावी वेळ आहे. दर दोन महिन्याआड या परिसरात जलवाहिनी फुटत असल्याने परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी घरात, दुकानात पाणी घुसत असल्याने हैराण झाले आहेत. एमआयडीसीने सतत फुटणाऱ्या जलवाहिन्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. कल्याण-शिळफाटा रस्त्यावर सकाळच्या वेळेत वाहनांची वर्दळ सुरू असताना कोकण किंग ढाबा परिसरातून गेलेल्या जलवाहिनीजवळ अचानक मोठा आवाज झाला. अतिशय वेगाने एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणी बाहेर फेकले गेले. पाण्याचे कारंजे उडाले. हा प्रकार पाहण्यासाठी काही वेळ वाहने थांबल्याने या भागात वाहन कोंडी झाली. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर आले. रस्त्याला काही वेळ नदीचे स्वरूप आले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ काटई-ठाणे दिशेचा पाणीपुरवठा बंद केला. एमआयडीसीचे जलवाहिनी देखभाल-दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. एमआयडीसीच्या महापे विभागाच्या अंतर्गत हा भाग येतो.

पाणीपुरवठय़ावर परिणाम

एमआयडीसीच्या जलवाहिन्यांमधून ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, डोंबिवली निवासी, औद्योगिक क्षेत्र, २७ गाव भागाला पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटीचा या भागांना फटका बसणार आहे. या जलवाहिन्यांमधून दररोज सुमारे ९०० ते १००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा या शहरांना केला जातो. जलवाहिनी फुटल्यानंतर पुन्हा पूर्ण क्षमतेने जलवाहिन्यांमधून पाणी सुरू होण्यास विलंब लागतो. त्यामुळे पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांना पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

शिळफाटा रस्त्यावर फुटलेली एमआयडीसीची जलवाहिनी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shilphata road under water due to water pipeline burst zws

ताज्या बातम्या