मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना शिंदे गट खासदार गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका असं म्हणत रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकरांवर हल्लाबोल केला. यावर गजानन कीर्तिकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गद्दार रामदास कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे अशी टीका गजानन कीर्तिकरांनी केली. याबाबत आज उद्धव ठाकरेंना विचारलं असता उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“गद्दारांच्या वाटा गद्दारांना माहीत मी त्यावर काय बोलणार?” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या वादावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आणि विषय संपवला आहे. गजानान कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्या वादाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

रामदास कदम नक्की काय म्हणाले होते?

“गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात आहे. फक्त लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचं कारण नाही. पण, एकाच कार्यालयात मुलगा आणि वडील बसतात. काय करताय हे सर्व जग पाहतेय. मुलगा ठाकरे गटातून तर तुम्ही शिंदे गटातून अर्ज दाखल कराल. नंतर मुलाला बिनविरोध निवडून द्यायचं, असं कटकारस्थान होता कामा नये. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, ही विनंती आहे,” असं रामदास कदमांनी म्हटलं होतं.

“मला पाडण्यासाठी रामदास कदमांनी प्रयत्न केले”

यावर एक परिपत्रक काढत गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांना लक्ष्य केलं आहे. गजानन कीर्तिकर म्हणाले, “रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. १९९० साली मी मालाड विधानसभेतून निवडणुकीला उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले आणि मला पाडण्यासाठी प्रयत्न केले.” असं कीर्तिकर म्हणाले. त्याबाबत उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गद्दांराना धडा शिकवणं ठाणेकरांना माहीत

गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी ठाण्यात येण्याची गरज नाही. कारण गद्दारांना धडा कसा शिकवायचा हे ठाणेकरांना माहीत आहे. गद्दारांना धडा शिकवा हा आमच्या आनंद दिघेंचा गुरुमंत्र हा ठाणेकरांनी जोपासला आहे. त्यामुळे ठाण्यात गद्दारी चालणाच नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला आहे.