ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून ओ‌ळखले जाणारे कळवा परिसरातील माजी नगरसेवक जितेंद्र पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा भागावर लक्ष केंद्रीत करून शिंदे समर्थकांनी पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा भागाचे प्रतिनिधित्व करतात. या भागातून महापालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. हा संपूर्ण परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात हा परिसर येतो. त्यामुळेच राज्यातील सत्ताबदलानंतर डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा-मुंब्रा भागावर लक्ष केंद्रीत करत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू केल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – प्रस्तावित आंबिवली-मुरबाड रेल्वे मार्गाला बेकायदा बांधकामांचा विळखा, भरपाईसाठी ६०० हून अधिक निवाऱ्यांची उभारणी

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनीही ‘कळवा मिशन’ची घोषणा केली होती. या घोषणेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपल्याचे चित्र होते. तसेच या भागातील प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमांवरूनही शिंदे आणि आव्हाड यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगताना दिसून येत आहे. या कार्यक्रमांमध्ये शिंदे आणि आव्हाड यांनी एकमेकांना टोले मारत चिमटे काढल्याचेही दिसून आले होते.

हेही वाचा – डोंबिवलीत काँक्रीट रस्त्यासाठी नांदिवली टेकडीचा चढ-उतार काढण्यास भूमाफियाचा विरोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांपूर्वी विटावा भागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. परंतु त्यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश निश्चित मानला जात असला तरी ते केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पारसिक नगर येथील ९० फूट रस्ता येथे मराठी बाणा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान, जितेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर या भागातील उद्योजक संतोष तोडकर यांनीही कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला.