आयुक्तांकडून फक्त खड्डे पाहणीचा देखावा
कल्याण – कल्याण पूर्व भागातील खड्ड्यांच्या विळख्यात असलेल्या रस्त्यांची अवस्था दोन दिवसापूर्वी शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आयुक्त अभिनव गोयल यांना सोबत घेऊन दाखविली. त्याच बरोबर शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी पालिकेला नवरात्रोत्सवापूर्वी तातडीने खड्डे भरणीची काम पूर्ण करा, असे कळविले होते. आयुक्तांनी पाहणी दौरा करूनही कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे भरणीची कामे पूर्ण केली जात नसल्याने शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी नवरात्रोत्सवापूर्वी खड्डे भरा, अन्यथा जनआंदोलन उभारू, त्या खड्ड्यात अधिकाऱ्यांना गाडू असा इशारा दिला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गणपती तोंडावर आले तरी शहरातील खड्डे भरण्याची कामे ठेकेदारांकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे आयुक्तांना विशेष बैठक घेऊन ठेकेदारांना गणपती पूर्वी खड्डे भरणीची कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला काळ्या यादीत टाकली जाईल, अशी तंबी द्यावी लागली होती. गेल्या वीस दिवसाच्या कालावधीत रस्त्यावरील भरणी केलेल्या खड्ड्यातील सीमेंट, खडी मुसळधार पावसात वाहून गेली आहे. आता जैसे थे खड्डे झाले आहेत.
आता नवरात्रोत्साव उंबरठ्यावर आला आहे. देवी मंडपात नेण्याची सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची लगबग सुरू आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव असतो. लाखो भाविक येथे नऊ दिवसाच्या कालावधीत दर्शनासाठी येतात. दुर्गाडी मंदिर परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, नांदिवली, तिसगाव, नेवाळी रस्ता भागातील रस्त्यांवरील खड्डे, तेथील दुरवस्था माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आयुक्त अभिनव गोयल यांना सोबत घेऊन दाखवली होती. ही परिस्थिती पाहून आयुक्त गोयल ठेकेदारांना तातडीने हे रस्ते सुस्थितीत करण्याचे निर्देश देतील आणि ही कामे लवकर सुरू होतील असे महेश गायकवाड यांना वाटले होते.
पण आयुक्त पाहणी करूनही रस्त्यांंवरील खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीत करण्याची कोणतीही हालचाल प्रशासन, ठेकेदारांकडून दिसत नसल्याने अखेर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी नवरात्रोत्सवापूर्वी खड्डे भरण्याची कामे प्रशासनाने पूर्ण केली नाहीतर जागोजागी जनआंदोलन उभारू, असा इशारा दिला आहे.
कल्याण पश्चिम शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनीही येत्या पाच दिवसाच्या कालावधीत शहरातील खड्डे भरणी, रस्ते पुनर्पृष्ठीकरणाची कामे पालिकेने पूर्ण केली नाहीत आणि रस्त्यांवर खड्डे दिसले तर मात्र त्या भागातील अधिकाऱ्यांना त्या खड्ड्यात गाडू असा इशारा दिला आहे. पालिकेतील सत्ताधारी असुनही शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनाही प्रशासन दाद देत नसल्याने मग सामान्य माणसांंना तेथे कोण विचारत असेल असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी रस्ते कामे ही राजकीय दबावातून ठेकदारांनी घेतले आहेत. वजनदार राजकीय व्यक्तिंशी या ठेकेदारांचा संबंध असल्याने हे ठेकेदार राजकीय वजनातून पालिका अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याची चर्चा आहे. एखादा अधिकारी ठेकेदाराला नडला तर मात्र त्याची तक्रार राजकीय वजनदार व्यक्तिकडे केली जाते. त्यामुळे अधिकारी ठकेदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करत नसल्याची चर्चा आहे.