डोंबिवली – पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्याने भारत सरकार आणि भारतीय लष्कराचे कौतुक करण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या डोंबिवली शहरातील शिवसैनिकांनी बुधवारी मध्यवर्ति शिवसेना शाखेसमोर आनंदोत्सव साजरा केला.

महिला, पुरूष शिवसैनिक उत्साहाने या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. ध्वनीक्षेपकावर भारतीय विजय, राष्ट्रप्रेमाची गाणी लावून शिवसैनिक नृत्य करत शिवसैनिक जल्लोषात सहभागी झाले होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांना ठार मारण्यात आले. याविषयी डोंबिवलीतील नागरिकांच्या मनात तीव्र चीड, संताप होता.

दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची, पाकिस्तानला अद्दल घडविण्याची नागरिकांची जोरदार मागणी होती. भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त करून त्यात काही दहशतवादी मारले गेले असल्याचे नागरिकांना पहाटे समजले. त्यानंतर देशभर विशेषता महाराष्ट्रात आनंदोत्सवाला भरते आले.

भारत सरकार आणि भारतीय लष्कराचे कौतुक करण्यासाठी शिंदे शिवसेनचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पाकिस्ताचा झेडा फाडून पायदळी तुडविण्यात आला. भारताच्या ध्वजाला महिलांनी कुंकु लावून विजयोत्सव करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आनंदोत्सवात डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर सचिव संतोष चव्हाण, महिला संघटक कविता गावंड, केतकी पवार, लक्ष्मी पवार, रश्मी गव्हाणे, भावना चव्हाण, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, शहर अध्यक्ष सागर जेधे, सागर दुबे, गजानन व्यापारी, संतोष तळाशिलकर, दिनेश शिवलकर, राहुल गणपुले, अमित बनसोडे, तुषार शिंदे, रणजित जोशी, वैभव राणे, तेजस पाटील, गौरव डामरे, शिवराम हळदणकर सहभागी झाले होते. शहराच्या इतर भागात नागरिक, व्यापाऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.