अंबरनाथमधील मोरिवली प्रभागाचे शिवसेना नगरसेवक रमेश साहेबराव गुंजाळ यांच्यावर शुक्रवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघात हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. गुंजाळ यांच्या मानेवर चॉपर आणि तलवारने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दुपारी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पालिकेत गुंजाळ २०१० साली अंबरनाथ पश्चिम भागातील मोरिवली येथून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. या वेळी शिवसेनेला समर्थन दिल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी नेमणूक झाली होती. त्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये ते पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते.
दरम्यानच्या काळात त्यांनी चाळीसगाव मतदारसंघात २०१४ साली अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढविली होती. त्यांच्या या राजकीय इच्छाशक्तीमुळे त्यांना जळगाव जिल्ह्य़ाचे उपजिल्हा प्रमुखपदही देण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी गुंजाळ दाढी करण्यासाठी अंगरक्षकाशिवाय एकटेच दुचाकीवरून केशकर्तनालयात गेले होते. दाढी करून परत येत असताना त्यांची मोटरसायकल अडवत त्यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी तलवार आणि चॉपरने वार केले. गुंजाळ रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना काही लोकांनी त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
चार तास हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दुपारी अडीच वाजता गुंजाळ यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मृत्यूमुळे अंबरनाथ शहर बंद ठेवण्यात आले. गेल्या काही वर्षांत शहरातील या सहाव्या नगरसेवकाच्या हत्येमुळे शहरात खळबळ माजली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena councillor murder in ambernath
First published on: 26-12-2015 at 00:01 IST