शहापूर : तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी मनोज राजपूत उर्फ मन्या याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. मनोज हा शहापूर तालुक्यातील धसई येथे लपून बसला होता. अटकेनंतर त्याला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची जमिनीच्या वादातून १९ जून रोजी त्यांचा भाऊ अविनाश धोडी याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने अपहरण करुन हत्या केली होती. या घटनेनंतर अविनाश आणि त्यांचे साथीदार फरार होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी अविनाश धोडी याला सेलवास येथून अटक करण्यात आली. त्यानंतर, या हत्या प्रकरणात फरार असलेल्या मनोज राजपूतचा शोध सुरू होता.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. टी. पाटील, व्ही. डी. सानप, आर. जी. नलावडे आणि एम. बी. भोईर यांच्या पथकाने तपासाची दिशा ठरवत कारवाई केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून राजपूतला ताब्यात घेतले. या अटके दरम्यान आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू, पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पुढील तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.