– भाजपचे नरेंद्र पवार यांचे बेमुदत उपोषण सुरू
कल्याण – कल्याण मधील तेरा वर्ष रखडलेल्या शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकासाच्या विषयावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान शिंदे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या सोसायटीचा रखडलेला विषय मार्गी लावण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. म्हाडाने यासंदर्भात एक अहवाल शासनाला देणार आहे. असे असताना भाजपचे नरेंद्र पवार हा विषय अनावश्यक चिघळवत आहेत, अशी टीका शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.
आमदार भोईर यांना जनतेने निवडून दिले आहे. लोकांचे प्रश्न सोडविणे हे त्यांचे काम आहे. मग ते विकासकाची बाजू घेऊन का त्यांची वकिली करत आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आमदार भोईर यांना दिले आहे. शांतीदूत सोसायटीच्या १८४ सदस्यांसह माजी आमदार पवार यांनी हा प्रकल्प मार्गी लागण्याचे आश्वासन मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील शांतीदूत या म्हाडाच्या नियंत्रणाखालील सोसायटीचा पुनर्विकास करण्याचे काम एका खासगी विकासकाने तेरा वर्षापूर्वी हाती घेतले आहे. शांतीदूत सोसायटी पुनर्विकासासाठी खासगी विकासकाच्या ताब्यात गेल्यानंतर तेथील १८४ सदस्यांनी इतरत्र भाड्याने जागा घेतल्या. विकासकाने त्यांना प्रकल्प पूर्ण होईपर्यंत भाडे देण्याचे आश्वासन दिले आहे. आता तेरा वर्षापासून रहिवासी आपला प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. मागील ४६ महिन्यांपासून त्यांना विकासकाने भाडे दिले नाही, अशी माहिती पवार यांनी दिली.
पावसाळी अधिवेशनात योगेश टिळेकर यांनी शांतीदूत सोसायटीचा प्रश्न उपस्थित केला होता. शांतीदूतमधील रहिवाशांच्या समर्थनार्थ पवार यांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर शिंदे शिवसेनेचे आमदार भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील यांनी शांतीदूत सोसायटी सदस्यांची भेट घेतली. आमदार भोईर यांनी माध्यमांना सांगितले, शांतीदूत सोसायटीप्रकरणी उपोषण करून नरेंद्र पवार हा विषय नाहक चिघळवत आहेत. याविषयी गृहनिर्माण विभागाकडे बैठक होणार आहे. यासंदर्भात म्हाडा एक अहवाल शासनाला देणार आहे. म्हाडाने या सोसायटीसंदर्भात संबंधित विकासक या सोसायटीचा विकास करू शकत नाही असा अहवाल दिला तर शासन, म्हाडा यावर योग्य निर्णय घेईल. पवार यांनी हा विषय चिघळवू नये.
आमदार भोईर यांच्या भूमिकेवर बोलताना भाजपचे पवार यांनी सांगितले, आमदार भोईर यांना जनतेने निवडून दिले आहे. त्यांनी जनतेची वकिली करावी. विकासकाची नव्हे. या गृहप्रकल्पाच्या विकासकाने वित्तीय संस्थेकडून सुमारे ३५० कोटीचे कर्ज उचलले आहे. मग शांतीदूत प्रकल्प का रखडला हे प्रश्न आमदार भोईर यांना पडत नाहीत का, असे प्रश्न पवार यांनी केले आहेत.
शांतीदूत सोसायटी सदस्यांना न्याय मिळाला पाहिजे या विचारातून आपण रहिवाशांच्या समर्थनार्थ सनदशीर मार्गाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. – नरेंद्र पवार, भाजप माजी आमदार