ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे.  त्यात एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता ‘ खासदार ‘ झाला आहे, हा आहे नवा  ‘हिंदुस्थान ‘ , असे म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओ‌‌ळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली आहे. राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार केला होता. तर, धनुष्यबाणाचा कार्यकर्ता असा प्रचार नरेश म्हस्के यांनी केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे दोन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले. या विजयाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाण्याचा गड राखला. तसेच तेच ठाणेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे समाज माध्यमातून आभार मानले आहेत. त्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होत आहे. एक चहावाला पंतप्रधान होतो , एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता  ‘ खासदार ‘ झाला आहे, हा आहे नवा  ‘हिंदुस्थान ‘ , असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनधी झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या  सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली, असेही त्यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.