कल्याण – सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती निमित्त नेहमीच चालू घटना-घडामोडींवर देखावे उभे करण्यात कल्याण पश्चिमेतील रामबाग शिवसेना शाखा, येथील गणेशोत्सव मंडळ नेहमीच आघाडीवर असते. या देखाव्यांवरून अनेक वेळा पोलीस, न्यायालयीन प्रक्रिया आयोजकांना पार पाडव्या लागल्या आहेत. सोमवारच्या (ता.१५) शिवजयंती निमित्त रामबाग शिवसेना शाखेने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांचा जाहीर निषेध करणारा देखावा, तसेच लोकांमध्ये गद्दार नसते, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर भारताचा नव्हे, जगाचा इतिहास वेगळा असता असा देखावा चित्ररथामध्ये चितारला आहे.

या देखाव्याच्या चित्रमय प्रतिमा, कलाकृतींमधून अर्थाचा अनर्थ होत असल्याने रामबाग शिवसेना शाखेने सजविलेल्या चित्ररथावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. चालू घडामोडींवरील या चित्ररथावरील कलाकृती, प्रतिमांमधून दोन अर्थ निघत असल्याने या चित्ररथाचा पुनर्विचार करावा, असे पोलिसांनी या कलाकृतींचे मुख्य संंकल्पक आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना सूचविले आहे.

सोमवारच्या कल्याणमधील शिवजयंती मिरवणुकीत सामील होण्यासाठी रामबाग शिवसेना शाखेचा चित्ररथ सज्ज झाला आहे. जिल्हाप्रमुख साळवी यांचे सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव, शिवजयंती काळातील चालू घडामोडींवरील देखावे नेहमीच राज्य शासक प्रमुखांवर चित्र कलाकृतींमधून चित्रमय हल्ले करणारे असतात. रामबाग शाखेच्या कलाकृतींवर पोलिसांच्या गोपनीय विभागाची करडी नजर असते.

यावेळी शिवजयंती निमित्त विजय साळवी यांच्या संकल्पनेतून रामबाग शिवसेना शाखेने छत्रपती संभाजी राजे यांचा मृत्यू हा लोकांमधील गद्दारांमुळे झाला. हे गद्दार नसते, या गद्दारांंनी संभाजी महाराजांना पकडून दिले नसते तर संभाजी महाराजांमुळे भारत देश नव्हे, तर जगाचा इतिहास वेगळा असता, असा कलात्मक देखावा चित्ररथावर चितारला आहे. संभाजी राजांबरोबर आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर राजांनी औरंगजेबाला धडा शिकवला असते, असे दृश्य चित्ररथावर आहे.

वाचाळविरांवर आसूड

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही महिन्यांपासून काही वाचाळवीर सतत आक्षेपार्ह बडबडत आहेत. सामाजिक विद्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. अशा वाचाळविरांचा समाचार या चित्ररथावर रामबाग शिवसेना शाखेने घेतला आहे. यामध्ये सुधांधु त्रिवेदी, प्रशांत कोरटकर, मंगलप्रभात लोढा, भाजप नेता छिंदम, राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिकात्म कलाकृतींचा समावेश आहे.

लोकांमधील गद्दार लोकांनी सभांजी महाराजांना पकडून दिले. हे गद्दार नसते तर आज भारत, जगाचा इतिहास वेगळा असता हे वास्तव आहे. हाच देखावा आम्ही शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्ररथावर चितारला आहे. शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांचा समाचार चित्रकृती मधून घेतला आहे. चालू घटनांवरील या कलाकृती पोलिसांना आक्षेपार्ह वाटतात याचे आश्चर्य वाटते.-,विजय साळवी, जिल्हाप्रमुख,ठाकरे गट, कल्याण.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप आमच्यापर्यंत हा विषय परवानगीसाठी आलेला नाही. सध्या तरी आम्हाला कोठे काही आक्षेपार्ह दिसत नाही. असा कोणी चित्ररथ केला असेल तर शहरप्रमुखाकडून परवानगीसाठी अर्ज येतो. तशी परवानगी आमच्याकडे कोणी मागितलेली नाही.-कल्याणजी घेटे,साहाय्यक पोलीस आयुक्त,कल्याण.