ठाणे : व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी मंगळवारी मीरारोडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यात मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्च्यावरून आता शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी समाजमाध्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करत ‘आयत्या बिळावर नागोबा ‘ हे उबाठाने सिद्ध केलयं’, अशी टिका केली.
मराठी भाषा बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषक व्यापाऱ्याला मारहाण झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्याला उत्तर म्हणून मंगळवारी मनसेने मराठी भाषकांच्या मोर्चाची हाक दिली होती. पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. यानंतरही मोर्च्यासाठी नागरिक जमले होते. शिवसेना (ठाकरे) तसेच मराठी एकीकरण समितीसह अनेक संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा गेले होते. परंतु नागरिकांच्या विरोधानंतर त्यांना माघारी परतावे लागले होते. यावरूनच शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी समाजमाध्यांवर प्रतिक्रिया व्यक्त ठाकरे गटावर टिकेचे बाण सोडले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीने मीरारोडला आयोजित केलेल्या मोर्चामध्ये आपली दोन-चार डोकी घुसवून पुन्हा एकदा आपण ‘आयत्या बिळावर नागोबा’ आहोत हे उबाठाने सिद्ध केलं, अशी टिका म्हस्के यांनी केली आहे. गर्दीत वर्दी लावणारे त्यांचे कार्यकर्ते जागा मिळेल तिथे आपण कसे चमकू याचाच विचार करत होते. एक मराठी आमदार असलेला माणूस मराठी भाषेसाठी मराठी एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी व्हायला गेला तर गुंडगिरी करून, अश्लील, हीन भाषेमध्ये त्याच्यावर टिप्पणी केली गेली. उबाठावाल्यांनो तुम्हाला थोड्या तरी लाजा वाटू द्या आणि हो, गर्दीत दादागिरीची भाषा काय करताय? पाण्याची बाटली काय फेकताय? ठाण्यातल्या श्रीनगर पोलीस स्टेशनची स्टोरी विसरलात का? समोरासमोर येऊन बोलायची हिम्मत आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
एक तर मनसे आणि मराठी एकीकरण समितीने कष्टपूर्वक मोर्चा आयोजित केला. त्याची परवानगी मागायलाही त्यांचेच कार्यकर्ते गेले आणि तुम्ही मात्र कॅमेऱ्याला बाईट देण्यासाठी आयत्या वेळी येऊन बसलात. तुमचे खोके, गद्दार, कोथळा, मर्द हे आता लोकांमध्ये नाही चालणार…त्याचा वापर मनोरंजनासाठी करतात लोक. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी महायुतीने केलेल्या कामाचा गड तुम्हाला कोणत्याच स्वरूपात सर करता येणार नाही. अश्लील- असभ्य भाषेतले भाषण, न शोभणारे अंगभिक्षेप, चेहरा आणि बोलण्यात मग्रुरी यामुळे आता महाराष्ट्रातली जनता उबगली आहे. तुम्ही आता दुसरे काहीतरी शोधा. ते तुम्हाला झेपत नाही, असेही ते म्हणाले.