water shortage : दिवा शहरातील पाणीटंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. गेल्या १२ वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचे श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा निषेध केला आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधले. लवकरात लवकर पाणी प्रश्न सुटला नाही तर, शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

दिव्या शहरात पाणी टंचाईची समस्या मोठ्याप्रमाणात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पाण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागते. या शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर व्हावी यासाठी या शहरातील बेतवडे येथे १२ वर्षांपूर्वी दोन जलकुंभ बांधले होते. परंतू, हे दोन्ही जलकुंभ आजतागायत बंद असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांत असमान पाणी वितरण होत आहे. तर, काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाणी टंचाईची समस्या असतानाही अद्याप हे जलकुंभ सुरु करण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक विविध टीका करु लागले आहेत. आता, यामध्ये विरोधी पक्षाने देखील उडी घेतली आहे.

नागरिकांसाठी बांधण्यात आलेले जलकुंभ अद्याप बंद का असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट) पक्षाकडून विचारला जाऊ लागला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वतीने रविवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचे ‘श्राद्ध’ घालत आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि ‘अंतिम संस्कार’ करत प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा निषेध केला. यावेळी ज्योती पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. “जर या जलकुंभातून पाणीपुरवठा करायचाच नव्हता, तर ते कशाला बांधले? आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च कोणाकडून वसूल करणार?” असे सवाल त्यांनी केले.

हे आंदोलन शिवसेना (ठाकरे) नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, सुभाष भोईर आणि जिल्हा संघटक तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. महिला जिल्हा संपर्कप्रमुख मृणाल यज्ञेश्वरी आणि महिला जिल्हा संघटिका वैशाली दरेकर-राणे यांच्या सूचनेनुसार या आंदोलनाची योजना आखण्यात आली. या आंदोलनात दिवा शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.