युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वरळीमध्ये ‘केम छो वरळी’ हे गुजराती भाषेतील बॅनर लावल्याने बराच वाद झाला. मात्र गुजरातीच नाही अनेक भाषांमध्ये हे बॅनर लावल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले होते. हे प्रकरण शांत होत असतानाच आता शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचारासाठी चक्क गुजराती भाषेत जाहिरात बनवली आहे. ठाण्यातील पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या शिंदे यांनी मराठी कलाकारांना घेऊन गुजरातीमध्ये जाहिरात केली आहे. यावरुन अनेकांनी नेटवर आक्षेप नोंदवला असून ठाण्यातील उमेदवाराने गुजराती भाषेत जाहिरात करण्याचा काय संबंध असा सवाल अनेकांनी या पोस्टखाली केलेल्या कमेंटमधून उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पोस्ट केलेल्या जाहिरातीमध्ये ठाण्यातील टिकुजीनीवाडी ते बोरीवलीपर्यंत भुयारी मार्ग बांधण्याच्या प्रकल्पाचा उल्लेख केला आहे. ठाणे आणि बोरिवली ही दोन महत्वाची शहरे या बोगद्यामुळे दहा मिनिटांच्या अंतरावर येतील असं या व्हिडिओत नमूद करण्यात आले आहे. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती एक गुजराती व्यापारी आणि त्याच्या पत्नीमधील संवादाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये पतीची भूमिका कुशल बद्रीकेने केली असून पत्नीच्या भूमिकेमध्ये हेमांगी कवी हे मराठी कलाकार आहेत.

मात्र या जाहिरातीवर अनेक मराठी नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. एकनाथ शिंदे मराठी, ठाण्यातील त्यांच्या मतदारसंघामध्ये बहुतांश जनता मराठी, जाहिरातील कलाकार मराठी मग जाहिरात गुजराती भाषेत का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, काही जणांनी कमेंट सेक्शनमध्ये शिंदे यांनी मागील निवडणुकांच्या वेळी दिलेले कल्याण ते ठाणे रेल्वेला समांतर रस्ताच्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader eknath shinde made advertising in gujrati language marathi people ask why scsg
First published on: 17-10-2019 at 17:21 IST