कळवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुचर्चित खारेगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. असे असतानाच शनिवारी पुलाच्या उदघाटन कार्यक्रमस्थळी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणा युद्ध रंगल्याचे चित्र दिसून आले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचा दावा करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पुलाचे उट्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी केली होती. तर, या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

उद्घाटनावरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यातच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी पुलाचे लोकार्पण करण्याचे पालिकेने निश्चित केले. या कार्यक्रमाच्या परिसरातील रस्त्यावर शिवसेनेने बॅनर आणि पक्षाचे झेंडे लावले होते. तर पुलाच्या एका बाजूला शिवसेनेचे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पक्षाने झेंडे लावले होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड आगे बढोच्या तर सेनेकडून कोण आला कोण आला सेनेचा वाघ आला अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना शांत केले.