वसई : मीरा रोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मनोज साने याने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कुकरमध्ये शिजविल्याचे तपासात उघड झाले आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेतील आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मीरा रोडच्या गीतनगर भागातील गीता दिप या इमारतीच्या ७ व्या मजल्यावर मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे दोघे मागील तीन वर्षांपासून भाडय़ाच्या सदनिकेत रहात होते. बुधवारी संध्याकाळी घरातून दुर्गंधी येत असल्यानंतर सरस्वतीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले, की ३ जूनच्या मध्यरात्री मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि ४ जूनच्या पहाटेपासून पुढले सलग ४ दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता. बाथरूममध्ये विद्युत करतवीने आणि एक्सॉ ब्लेडच्या सहाय्याने त्याने मृतदेहाचे असंख्य बारीक तुकडे केले. विल्हेवाट लावण्यापूर्वी हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी तो एकेक अवयव कुकरमध्ये शिजवत होता. कुकर, ३ पातेली आणि २ बादल्यांमध्ये मृतदेहाचे असंख्य तुकडे पोलिसांना आढळले आहेत. मनोजने मृतदेहाच्या डोक्याचेही असंख्य तुकडे केले होते. हे सर्व तुकडे जेजे रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यानंतरच त्याने कोणत्या अवयवांची विल्हेवाट लावली हे स्पष्ट होऊ शकेल, असे बजबळे यांनी स्पष्ट केले.
हत्येनंतर सामान्य वर्तन
सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोज घरातच राहात होता. स्वयंपाकघरात मृतदेह शिजवत असल्यामुळे तो दोन्ही वेळचे जेवण बाहेर करीत होता. या काळात त्याचे वागणे सामान्य असल्याचे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले. मनोजला एक असाध्य आजार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कारण अस्पष्ट
सरस्वतीची हत्या पूर्वनियोजन असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या आतापर्यंतच्या चौकशीतून हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी साने एकदम शांत असून तपासात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सरस्वतीने विष प्राशन करून आत्महत्या केली आणि त्यानंतर घाबरून आपण मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असे तो सांगत आहे. मात्र सर्व शक्यता पडताळून तपास केला जात असल्याचे बजबळे यांनी स्पष्ट केले. गुरूवारी ठाणे सत्र न्यायालयाने मनोजला १६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ओळख, प्रेम आणि हत्या मनोज साने हा मूळचा बोरिवलीचा राहणारा आहे. बाभई नाका येथील वडिलोपार्जित जागेवर २००८ मध्ये ‘साने रेसिडेन्सी’ नावाची इमारत बांधण्यात आली. तेथे त्याचे भाऊ राहतात. मनोजने आपली सदनिका मासिक ३५ हजार रुपये भाडय़ाने दिली आहे. बोरीवलीमध्ये तो एक शिधावाटप केंद्र चालवीत होता. २०१४मध्ये त्याची सरस्वती वैद्यशी ओळख झाली. सरस्वती अनाथ होती. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. गेल्या आठ वर्षांपासून दोघे मीरा रोड येथे राहण्यास होते. हत्या झाली त्या घरात गेली तीन वर्षे राहात होते.