ठाणे : येथील वर्तकनगर भागातील म्हाडाच्या भुखंडावरील अधिकृत गाळेधारकांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. बेकायदा बांधकामांमुळे गेल्या तीन वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्प रखडल्याचा आरोप करत येथील गाळेधारकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. पुनर्विकासात अडथळा ठरत असलेली बेकायदा बांधकामे तोडण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे.

वर्तकनगर येथील म्हाडाच्या अभिन्यासांमध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी भुखंड दर्शविण्यात आला आहे. त्यातील एक भुखंड वर्तकनगर शाॅपकिपर्स प्रिमायसेस को. ऑप. सोसायटी लिमिटेडच्या मालकीचा असून तिथे ८० गाळे होते. तर, दुसरा भुखंड म्हाडाच्या मालकीचा आहे. या दोन्ही भुखंडाचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, तीन वर्षांपुर्वी ८० गाळे तोडण्यात आले आणि हा भुखंड गाळेधारकांनी विकासकाला देऊ केला. तसेच बाजूचा म्हाडाचा भुखंड ताब्यात घेण्यासाठी विकासकाने पैसेही भरले. परंतु त्यावरील बेकायदा बांधकामे अद्याप हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या भुखंडाचा पुनर्विकास रखडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुनर्विकास रखडल्यामुळे गाळेधारक हवालदिल झाले. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून भाडेही मिळत नाही. यामुळे गाळेधारक मेटाकुटीला आले असून त्यांनी वर्तकनगर शाॅपकिपर्स प्रिमायसेस को. ऑप. सोसायटी लिमिटेडच्या ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व कॉँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केले. त्यांचे देखील याठिकाणी दोन गाळे आहेत. तीन वर्षापासून गाळे तोडल्याने अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथे अनेक जेष्ठ नागरीक, विधवा महिला यांचे गाळे होते. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.